• ड्रोन शोसह सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात– जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 13 : महाराशिवरात्री सणानिमित्त औंढा नागनाथ येथे होणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने तसेच यात्रेदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या ड्रोन शोच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे, पोलीस विभागाचे अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्य, परिवहन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच औंढा नागनाथ मंदिर समितीचे विश्वस्त उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यात्रेच्या कालावधीत पार्किंग ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे, पब्लिक अॅड्रेस सिस्टीमची व्यवस्था, गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, पुरेशी पार्किंग व्यवस्था, दर्शन बारी व मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा, अग्निशामक यंत्रणा, पोलीस बंदोबस्त, पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था, आरोग्य पथकाची नियुक्ती, आपत्कालीन परिस्थितीसाठी पुरेसा औषधी साठा तसेच जागोजागी स्क्रीनिंगची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित ड्रोन शोच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व व्यवस्था तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
भगवान बाहुबली मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आढावा
दरम्यान, या बैठकीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे दि. 18 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होणाऱ्या श्री 1008 भगवान बाहुबली मूर्तीच्या आंतरराष्ट्रीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहणार असून बाहेरगावाहूनही नागरिक येणार असल्याचे नमूद केले. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थेसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुका स्तरावर बैठक घेऊन सविस्तर नियोजन करण्याच्या सूचना सेनगावचे तहसीलदार सखाराम मांडवगडे यांना दिल्या.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, गट विकास अधिकारी, पोलीस विभाग, आरोग्य, महावितरण, परिवहन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment