27 February, 2026

विशेष लेख : हिंद की चादर - श्री गुरु तेग बहादूर साहिबजी

 

ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई येथे येत्या 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी श्री. गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि राज्य शासनाचे मंत्री उपसि्थत राहणार आहेत. शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बाहदूर साहिब यांच्या 350 व्या शहीदी समागमाच्या मुख्य कार्यक्रमाला शीख सिकलीगर, बंजार, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव समाजाचे धर्मगुरु उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला सर्व समुदायाला भाविक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जगभरातून 10 लाखापेक्षा जास्त भाविक उपस्थित राहण्याचा प्रशासनाचा अंदाज असून, त्यादृष्टीने राज्य शासन, स्थानिक प्रशासनाची तयारी सुरु आहे. 

धर्म म्हणजे केवळ पूजा, विधी किंवा बाह्य आचार नाही. धर्म म्हणजे सत्य, नीतिमत्ता आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य. जेव्हा धर्माच्या नावाखाली लोकांवर जबरदस्ती, भय आणि अत्याचार लादले जातात, तेव्हा त्या अन्यायाविरुद्ध उभे राहणारा व्यक्तीच खरा धार्मिक गुरु ठरतो. अशाच धर्मभावनेचे सर्वोच्च उदाहरण म्हणजे सिख धर्माचे नववे गुरु – श्री गुरु तेग बहादुरजी.

गुरु तेग बहादुरजी यांनी स्वतःचा धर्म जपत इतरांच्या धर्मस्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांनी कोणतीही सत्ता, वापरली नाही परंतु सत्य आणि निर्भयतेच्या बळावर अत्याचाराला आव्हान दिले. म्हणूनच इतिहासाने त्यांना ‘हिंद की चादर’ असे गौरवाने संबोधले. ‘हिंद की चादर’ म्हणजे अशी चादर, जी संकटाच्या वेळी संपूर्ण समाजाला संरक्षण देते. गुरु तेग बहादुरजी यांनी स्वतः संकटात उभे राहून बलिदान देऊन इतरांना वाचवले. त्यांचे जीवन, विचार आणि बलिदान हे आजही मानवतेसाठी मार्गदर्शक आहेत.


गुरु तेग बहादुरजी यांचा जन्म आणि जीवन

श्री गुरु तेग बहादुरजी यांचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे झाला. ते सहावे सिख गुरु गुरु हरगोबिंद साहिबजी यांचे पुत्र होते व शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंगजी चे वडील होते . लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव शांत, गंभीर आणि विचारशील होता. त्यांनी शस्त्रविद्या तसेच धार्मिक व आध्यात्मिक शिक्षण घेतले.  ‘तेग’ म्हणजे तलवार आणि ‘बहादुर’ म्हणजे शूर. युद्धकौशल्य असूनही त्यांचे मन ध्यान, साधना आणि आत्मचिंतनात अधिक रमले होते. त्यांनी अनेक वर्षे एकांतात साधना केली आणि जीवनाचे खरे तत्त्व समजून घेतले. इ.स. १६६४ मध्ये ते सिखांचे नववे गुरु झाले. गुरुपद स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध प्रदेशांत प्रवास करून लोकांना सत्य, समानता, निर्भयता आणि ईश्वरभक्तीचा संदेश दिला.


औरंगजेबाचा काळ आणि धार्मिक अत्याचार

गुरु तेग बहादुरजी यांचा काळ मुघल सम्राट औरंगजेब यांच्या कारकिर्दीचा होता. या काळात धर्माच्या नावाखाली अनेक अत्याचार झाले. लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडले जात होते. मंदिरे तोडली जात होती आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः काश्मीरमधील हिंदू पंडितांवर फार मोठे अत्याचार झाले. त्यांच्यासमोर दोनच पर्याय ठेवले गेले—धर्मांतर करा किंवा मृत्यू स्वीकारा.

काश्मिरी पंडितांची हाक आणि गुरुजींचा निर्णय

या अन्यायाने त्रस्त झालेल्या काश्मिरी पंडितांचे एक शिष्टमंडळ आनंदपूर साहिब येथे गुरु तेग बहादुरजी यांच्याकडे आले. त्यांनी आपली वेदना आणि संकट गुरुजींसमोर मांडले. गुरु तेग बहादुरजी यांनी शांतपणे सर्व ऐकले. धर्मरक्षणासाठी बलिदान देणे आवश्यक आहे, हे त्यांनी ओळखले. त्यांनी औरंगजेबाला या विरोधात संदेश पाठवला.

अटक, यातना आणि बलिदान

गुरु तेग बहादुरजी यांना दिल्लीला बोलावण्यात आले; परंतु मार्गातच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत त्यांच्या तीन शिष्यांनाही कैद करण्यात आले. भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयालदास. या शिष्यांवर भयानक अत्याचार करण्यात आले, तरीही त्यांनी धर्म सोडला नाही. अखेर ११ नोव्हेंबर १६७५ रोजी दिल्लीच्या चांदणी चौकात गुरु तेग बहादुरजी यांचे शिरच्छेद करण्यात आला.  त्यांनी मृत्यू स्वीकारला, पण धर्मांतर स्वीकारले नाही.

‘हिंद की चादर’ – अर्थ

‘चादर’ म्हणजे संरक्षण देणारे आच्छादन. गुरु तेग बहादुरजी यांनी स्वतःवर संकट ओढवून घेऊन संपूर्ण हिंदू समाजाला जबरदस्तीच्या धर्मांतरापासून वाचवले. त्यांनी इतरांच्या धर्मासाठी स्वतःचे प्राण दिले. म्हणूनच त्यांना “हिंद की चादर” म्हटले जाते. येथील ‘हिंद’ हा शब्द केवळ एका धर्मापुरता मर्यादित नसून, तो भारतीय जीवनमूल्ये आणि धर्मस्वातंत्र्याचे प्रतीक आहे.

गुरु तेग बहादुरजी यांचे तत्त्वज्ञान

वैराग्य - जगातील संपत्ती, सत्ता आणि देह नश्वर आहेत. त्यांच्याशी आसक्त न होता जगणे म्हणजे खरे वैराग्य.

निर्भयता - भयमुक्त जीवन हेच श्रेष्ठ जीवन आहे. जो माणूस सुख-दु:ख समान मानतो, तोच खरा स्थिर असतो.

खरा धर्म - धर्म म्हणजे कर्मकांड नव्हे, तर सत्यासाठी उभे राहणे. अन्याय पाहून गप्प बसणे हा अधर्म आहे.

गुरु ग्रंथ साहिबमधील निवडक श्लोक

१. “भय काहू को देत नहिं, नहिं भय मानत आन।”

अर्थ: जो कुणाला घाबरवत नाही आणि स्वतःही कुणाची भीती बाळगत नाही, तोच खरा महान आहे.

२. “सुख दुःख दोनउ सम करि जानै।”

अर्थ: जो सुख आणि दुःख समान मानतो, तोच जीवनाचे खरे ज्ञान जाणतो. 

---

श्री गुरु तेग बहादुरजी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मासाठी नव्हते, तर धर्मस्वातंत्र्यासाठी होते. त्यांनी सिद्ध करून दाखवले की खरा धर्म हा मानवतेवर आधारलेला असतो. म्हणूनच ते ‘हिंद की चादर’ ठरले. आजही त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की सत्यासाठी उभे राहणे कठीण असते, पण तेच योग्य असते. गुरु तेग बहादुरजी यांनी मानवतेवर पांघरलेली ही चादर आजही आपल्याला निर्भय, सत्यनिष्ठ आणि सहिष्णु राहण्याची प्रेरणा देते. 


- हरपालसिंह सेठी

- लेखक हे लोकमत टाईम्स हिंगोली येथे जिल्हा प्रतिनिधी आहेत.

****** 




No comments: