06 February, 2026

मेरा युवा भारततर्फे ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’चे आयोजन

 


हिंगोली (जिमाका), दि. ०६ : मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम विभाग, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, हिंगोली कार्यालयाच्या वतीने युवकांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत जागरूकता व समज विकसित करण्याच्या उद्देशाने ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा उपक्रम क्विझ स्पर्धा नोंदणी मोहिमेचा एक भाग असून तो बहुस्तरीय व सहभागी स्वरूपात राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन प्रश्नमंजुषा (क्विझ) आयोजित करण्यात येणार असून ही स्पर्धा दि. ०३ ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी माय भारत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रश्नमंजुषा (क्विझ) टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची राज्य व केंद्रशासित प्रदेश स्तरावर निबंध लेखन टप्प्यासाठी निवड करण्यात येणार असून, या टप्प्यात सहभागी युवकांना केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ च्या प्रमुख विषयांवर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात राज्य व केंद्रशासित प्रदेश स्तरावर निवडलेल्या युवकांना केंद्रीय अर्थसंकल्पावर धोरणकर्ते व मान्यवरांशी आभासी संवाद साधण्याची संधी देण्यात येणार आहे. यामुळे युवकांमध्ये धोरण प्रक्रियेबाबतची समज, जागरूकता व सहभाग अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ हा युवकांना केंद्रीय अर्थसंकल्पाशी जोडणारा एक अर्थपूर्ण उपक्रम असून, या माध्यमातून युवकांना धोरणनिर्मितीची प्रक्रिया समजून घेण्याची व त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याची संधी मिळणार आहे. 

जिल्ह्यातील सर्व युवकांनी दि. ०३ ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत माय भारत पोर्टलवर नोंदणी करून मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत, हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: