24 February, 2026

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस परीक्षा गुणयादी जाहीर * दुरुस्ती अर्जासाठी 5 मार्चपर्यंत मुदत

 


हिंगोली (जिमाका), दि. 24 : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षा सन 2025-26 साठी इयत्ता 8 वीची परीक्षा दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी आज दि. 24 फेब्रुवारी 2026 पासून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सन 2007-08 पासून मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या गुणवत्तेची जोपासना करणे व त्यांचे शिक्षण इयत्ता 12 वी पर्यंत पूर्ण व्हावे हा या योजनेचा उद्देश आहे. पात्र विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये (वार्षिक 12 हजार रुपये) शिष्यवृत्ती देण्यात येते.

इयत्ता 8 वीतील आर्थिक दुर्बल घटकांतील, वार्षिक उत्पन्न 3 लाख 50 हजार रुपयापेक्षा कमी असलेल्या व अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड ही गुणवत्तेच्या आधारे करण्यात येते.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या गुणयादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, आडनाव, जन्मतारीख, जात, आधार क्रमांक, माध्यम, प्रश्नपत्रिका संच कोड आदी बाबींमध्ये काही दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित शाळेच्या लॉगिनद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही दुरुस्ती प्रक्रिया दि. 5 मार्च 2026 पर्यंत खुली राहणार आहे.

ऑनलाईन पद्धतीशिवाय (टपाल, समक्ष किंवा ईमेलद्वारे) पाठविलेल्या अर्जांचा तसेच मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. प्राप्त दुरुस्त्यांनंतर पात्र विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

दरम्यान, विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या कार्बनलेस उत्तरपत्रिकेमुळे गुण पडताळणीची  सुविधा उपलब्ध नसल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी कळविले आहे.

 

********

No comments: