‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 26 : आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आल्या आहेत. त्यानुसार शुक्रवार, दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणे हे मराठी भाषा विभागाचे प्रमुख धोरण असून, पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विविध माध्यमांचा वापर करून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यक्रम राबविण्याच्या सूचना संबंधित परिपत्रकात नमूद करण्यात आल्या आहेत.
निबंध, वक्तृत्व, काव्यवाचन, मराठी भाषेतील साहित्य प्रदर्शन, डिजिटल माध्यमातून जनजागृती आदी उपक्रमांचे आयोजन शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व इतर संस्थांमध्ये करण्यात यावे. तसेच आयोजित कार्यक्रमांची माहिती व अहवाल शासनास सादर करण्याची कार्यवाही संबंधित कार्यालय प्रमुखांनी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
*******
No comments:
Post a Comment