कानिफनाथ यात्रेत आरोग्य विभागाचा जागर; अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया तपासणीसाठी विशेष जनजागृती
हिंगोली(जिमाका), दि. 27 : सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट येथील कानिफनाथ यात्रेचे औचित्य साधून अरुणोदय 'सिकलसेल ॲनिमियाबाबत विशेष जनजागृती करण्यात येत आहे. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागाचा जागर करण्यात येत आहे.
यावेळी जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका श्रीमती मनिषा वडकुते यांनी उपस्थित नागरिकांना सिकलसेल आजाराबद्दल माहिती दिली.
सिकल सेल म्हणजे काय? हा एक रक्ताचा अनुवांशिक आजार असून, यामध्ये रक्तातील लाल पेशींचा आकार विळ्यासारखा होतो, ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते.
लक्षणांची ओळख: सतत थकवा जाणवणे, सांधेदुखी, वारंवार आजारी पडणे हिमोग्लोबिनची कमतरता (ॲनिमिया) ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत.
तपासणीचे महत्त्व: वेळेवर निदान झाल्यास या आजारावर योग्य उपचार करणे शक्य आहे.
"सिकल सेल हा आजार टाळण्यासाठी आणि वेळीच तपासणी करून घेणे आवश्यक आहे. उपचार घेण्यासाठी आपली आरोग्य स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन सिकलसेलची मोफत तपासणी करून घ्यावी. यामुळे यात्रेत येणाऱ्या हजारो भाविकांपर्यंत आरोग्य संदेश पोहोचण्यास मदत होत आहे. सिकल सेलमुक्त हिंगोली, असा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.
*****

No comments:
Post a Comment