10 February, 2026

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत 28 फेब्रुवारी पर्यंत ग्रंथ सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि.10 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या समान निधी ‘ग्रंथभेट’ योजनेअंतर्गत सन 2025 या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करून राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट स्वरूपात वितरित करण्यात येणार आहेत.

या योजनेअंतर्गत खरेदीसाठी निवड करण्यात येणाऱ्या ग्रंथांचा तसेच ग्रंथालय संचालनालय स्तरावरून प्रसिद्ध होणाऱ्या “शासनमान्य ग्रंथ निवड यादी” मध्ये समावेश होण्यासाठी दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेले व प्रथम आवृत्ती असलेले ग्रंथ लेखक व प्रकाशकांनी प्रत्येकी एक विनामूल्य प्रत सादर करणे आवश्यक आहे. हे ग्रंथ ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पत्त्यावर सादर करावेत.

ग्रंथ सादर करण्याची अंतिम मुदत दि. 28 फेब्रुवारी 2026 असून, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या ग्रंथांचा ग्रंथ निवड यादीसाठी विचार करण्यात येणार नाही. सन 2025 मध्ये प्रकाशित झालेले ग्रंथ यापूर्वीच संचालनालयास पाठविण्यात आले असतील, तर ते पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही.

तसेच मुद्रण व नोंदणी अधिनियम, 1867 अन्वये मुद्रकाने व ग्रंथ प्रदान अधिनियम, 1954 अन्वये प्रकाशकाने प्रत्येकी एक प्रत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, मुंबई, शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे, शासकीय विभागीय ग्रंथालय, नागपूर या ग्रंथालयांकडे पाठविणे अनिवार्य आहे.

ग्रंथ संबंधित ग्रंथालयांकडे पोहोचल्याची पोचपावती प्राप्त करून ती ग्रंथालय संचालनालयास ग्रंथ पाठविताना टपालामार्फत किंवा समक्ष सादर करणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लेखक व प्रकाशकांनी विहित मुदतीत ग्रंथ सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

*****

No comments: