हिंगोली (जिमाका), दि. 06 : सन 2025-26 करिता राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांअंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या कालावधीत वाढ करण्याची विद्यार्थ्यांकडून मागणी प्राप्त झाली होती. तसेच वसतिगृह प्रवेशासाठी अपेक्षित अर्ज प्राप्त न झाल्याने व अर्ज करताना विविध अडचणी उद्भवल्याने, बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकास दि. 15 फेब्रुवारी, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यानुसार, शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनांतर्गत प्रवेशासाठी अर्ज करण्याचा कालावधी दि. 6 ते दि. 15 फेब्रुवारी, 2026 असा वाढविण्यात आला आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे शपथपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.
विद्यार्थी भाड्याने राहत असून स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतल्याबाबतचे शपथपत्र/प्रतिज्ञापत्र, विद्यार्थी आई-वडिलांसोबत राहत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, शिक्षण घेत असताना कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करणार नाही याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
शासकीय वसतिगृहासाठी पात्र असूनही गुणवत्तेनुसार व वसतिगृहाच्या क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनांसाठी विचारात घेण्यात येणार आहेत.
त्यामुळे शासनाने दिलेल्या विहित कालावधीत दि. 6 ते 15 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यातील सर्व इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनांतर्गत प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
*******
No comments:
Post a Comment