11 February, 2026

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव, नटराज, विश्वकर्मा व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारांसाठी 21 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली(जिमाका), दि. 11 : इतर मागास विकास विभागांतर्गत कार्यरत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या मार्फत सन २०२५-२६ या वर्षाकरिता महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार यांसाठी पात्र व इच्छुक व्यक्ती तसेच संबंधित समाजाच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांकडून रितसर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

या पुरस्कारांसाठी अर्ज करणारी व्यक्ती अथवा संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल व शिफारस पत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अपूर्ण, चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबतचा अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी आपले प्रस्ताव दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे.

***

No comments: