27 February, 2026

महिला व बाल विकास विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आढावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांचा व उपक्रमांचा सविस्तर आढावा बैठक आज संपन्न झाली.

यावेळी बालविवाह (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 अन्वये आयोजित या बैठकीत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा कृती दल (Task Force – Covid-19), प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व योजना, बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दल, सखी वन स्टॉप सेंटर, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, बाल कल्याण समिती, जिल्हा सनियंत्रण समिती, समुपदेशन केंद्र, महिला सक्षमीकरण उपक्रम तसेच चाइल्ड हेल्पलाइन 1098 व महिला हेल्पलाइन 181 यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती कार्यक्रमांचा तसेच मिशन वात्सल्य, एनसीपीसीआर पोर्टल, घर पोर्टल, पीएम केअर पोर्टल व गती शक्ती पोर्टलवर नोंदविण्यात येणाऱ्या माहितीचा आढावा घेण्यात आला. प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व योजना आणि बालविवाह निर्मूलनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबतही चर्चा करण्यात आली. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची विविध माध्यमातून जनजागृती करावी. इयत्ता पहिली ते 10 वी पर्यंतच्या वर्गनिहाय विद्यार्थिनींची ट्रॅकींग करुन किती विद्यार्थी प्रवेशित आहेत. किती मुली शाळेत गैरहजर आहेत याची वर्षनिहाय माहिती सादर करावी. तसेच एप्रिल 2025 पासून आतापर्यंत धडक मोहीम राबवून सोनोग्राफी केंद्राची तपासणी केली त्यांची माहिती द्यावी, अशा सूचना दिल्या. 

जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड हेल्पलाइन 1098 यांच्या माध्यमातून जिल्ह्यात बालविवाह समूळ नष्ट करण्यासाठी प्रभावी नियोजन करून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. आर. दरपलवार यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा सादर केला.

या बैठकीस जिल्हा संरक्षण अधिकारी नितीश मकासरे, विधी सल्लागार श्रीमती पराते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, चाइल्ड हेल्पलाइन 1098 चे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे तसेच महिला व बाल विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

***** 




No comments: