हिंगोली (जिमाका), दि. 21 : हिंगोली येथे नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत हिंगोली येथे आयोजित प्रोटोकॉल डिझाइनिंग व एक्स्ट्राम्युरल फंडिंग संधी विषयक पहिल्या राष्ट्रीय परिषदेचा उद्घाटन समारंभ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
या परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय संशोधनाची जाणीव व दिशा दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाने संशोधनाभिमुख दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा देत संशोधनाधारित वैद्यकीय सेवेमुळे समाजाला अधिक परिणामकारक व वैज्ञानिक आरोग्यसेवा मिळू शकते, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
आयोजक अध्यक्ष तथा अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांनी प्रास्ताविकातून प्रोटोकॉल डिझाइनिंग व बाह्य निधी संधींचे महत्त्व स्पष्ट केले. संशोधन प्रस्तावांची गुणवत्ता, नैतिक मानके आणि निधी प्राप्तीची प्रक्रिया यांविषयी परिषदेत सखोल चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी एमएमसी निरीक्षक डॉ. कांचन अग्रवाल, एचएसआरएसएम डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल संचालक डॉ. हंसराज खुराना यांची उपस्थिती होती.
यावेळी वक्ते म्हणून डॉ. सचिन मुंबरे, डॉ. योगेश बहुरूपी, डॉ. सतीश वड्डे व डॉ. विजय डोम्पले यांनी सहभाग नोंदविला.
देशभरातून 500 पेक्षा अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले असून वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनवृत्तीला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक सचिव व उप-अधिष्ठाता डॉ. राजहर्ष हनमंते यांनी आभार प्रदर्शन केले.
******

No comments:
Post a Comment