12 February, 2026

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट ‘ड’ पदांची निवड व प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध

 



हिंगोली(जिमाका), दि. 12 : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट ‘ड’ संवर्गातील 284 पदे भरण्यासाठी आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत माहे जुलै-2025 मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल दि. 20 आॅगस्ट 2025 रोजी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता.

उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून सामाजिक व समांतर आरक्षण तसेच गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

कागदपत्र पडताळणीअंती तयार करण्यात आलेली निवड यादी, प्रतीक्षा यादी तसेच निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.igrmaharashtra.gov.in येथे दि. 10 फेब्रुवारी, 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट ‘ड’ संवर्गात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीच्या अनुषंगाने समुपदेशनासाठी लवकरच बोलावण्यात येणार आहे. समुपदेशनाचे स्थळ व दिनांक याबाबतची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल, असे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*******

No comments: