01 March, 2026

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात ध्वनिचित्रफितद्वारे प्रधानमंत्र्यांनी दिला संदेश


गुरु तेग बहादूरांच्या शौर्याची परंपरा नवी पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी



खारघर, दि. १ – महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागमाच्या माध्यमातून आपण महान परंपरेचे साक्षीदार होत आहोत. गुरूंनी दिलेला त्याग आणि सामाजिक एकतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे, असा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ध्वनिचित्रफितद्वारे दिला.

अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश ध्वनिचित्रफितद्वारे दाखविण्यात आला.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले की, गुरूंनी त्यागाची पराकाष्ठा केली. त्या काळात समाजातील सर्व घटक एकत्र उभे राहिले. सत्य आणि संस्कृतीसाठी ठाम राहण्याची प्रेरणा समाजाला मिळाली. या सामाजिक एकतेच्या महायज्ञात गुरु गोविंद सिंह आणि गुरु नानक नाम लेवा संगत यांची महत्त्वाची भूमिका होती. आज देशाला पुन्हा सामाजिक एकतेची गरज असताना हा समागम आश्वासक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या यात्रेची सुरुवात गेल्या वर्षी नागपूर येथून झाली. त्यानंतर तख्त श्री हजूर साहिब, नांदेड येथे कार्यक्रम पार पडला आणि आता नवी मुंबईत हा समागम महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या उपक्रमाद्वारे श्री गुरु तेग बहादूर यांचा शौर्यपूर्ण इतिहास महाराष्ट्रातील हजारो गावांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. या आयोजनाबद्दल प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.

देशभरात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत असल्याचे सांगत हरियाणातील कुरुक्षेत्र येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचा अनुभव त्यांनी सांगितला. केंद्र शासन गुरूं संबंधित प्रत्येक ऐतिहासिक प्रसंग राष्ट्रीय स्तरावर साजरा करत आहे. ४००वा प्रकाश पर्व, स्मृतिचिन्ह टपाल तिकीट आणि विशेष नाण्याचे प्रकाशन, तसेच गुरु नानक देव यांचा ५५०वा प्रकाश पर्व श्रद्धेने साजरा करण्यात आल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. साहिबजाद्यांच्या सन्मानार्थ ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याची परंपराही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

शीख समाजासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन सांगितले की, करतारपूर साहिब कॉरिडॉर विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला. श्री हेमकुंड साहिब यात्रेसाठी सुविधा उभारण्यात आल्या. शीख संघटना आणि गुरुद्वारांशी संबंधित संस्थांना एफसीआरए अंतर्गत सवलती देण्यात आल्या. शीख इतिहासाला अभ्यासक्रम आणि सांस्कृतिक चर्चेत स्थान देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानातील शीख बांधवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि गुरु ग्रंथ साहिब यांच्या सन्मानासाठी सरकारने मिशन मोडमध्ये काम केले. गुरु ग्रंथ साहिबांचे स्वरूप सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील शीख कुटुंबांसाठी पुनर्वसन पॅकेज लागू करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

शीख समाजाच्या श्रद्धेचा सन्मान आणि त्यांच्या प्रगतीसाठी नवे मार्ग निर्माण करणे ही आमची जबाबदारी असून ही सेवा करण्याचे आम्हाला सौभाग्य लाभले आहे, असे नमूद करत त्यांनी नवी पिढी गुरूंच्या साहस आणि सत्याच्या मूल्यांशी जोडली गेली पाहिजे, असे आवाहन केले. इतिहास केवळ स्मरणात न ठेवता तो आचरणात आणणे हेच या समागमाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००




अहंकारातून अहं-शून्यतेकडे… खारघरमध्ये उभारले ‘जुता घर’ सेवाभावाचे पवित्र प्रतीक

 

नवी मुंबई,दि.१: हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई  येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमासाठी लाखो भाविक उपस्थित राहणार असल्याने नियोजन अत्यंत बारकाईने करण्यात आले आहे.

 या नियोजनाचा एक अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक भाग म्हणजे कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेले ‘जुता घर’ भाविकांची पादत्राणे, बूट व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रवेशद्वाराजवळच डाव्या आणि उजव्या बाजूस उभारण्यात आलेले हे जुता घर चार विभागांत विभागलेले असून त्याची क्षमता  जवळपास दहा हजार पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे.

 प्रत्येक विभागनिहाय नियोजनासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून शिस्तबद्ध सेवा सुनिश्चित करण्यात आली आहे.परंतु हे केवळ पादत्राणे ठेवण्याचे ठिकाण नाही…

हे आहे अहंकारातून अहं-शून्यतेकडे नेणाऱ्या प्रवासाची सुरुवात.

माणसातला अहंकार कमी करण्याच्या भावनेतून अनेक भाविक स्वतःहून येथे सेवा देतात. इतरांची पादत्राणे नीट लावणे, त्यांची काळजी घेणे, हरवू नयेत म्हणून दक्ष राहणे—ही केवळ व्यवस्था नाही; ही नम्रतेची साधना आहे. सेवेतून आत्मिक समाधान मिळते, आणि ‘मी’पणाचा अंश हळूहळू विरघळत जातो.

मलाड, नेरुळ तसेच गुरु तेज बहादूर नगर येथील सेवक जत्थे या जुता घरात अहोरात्र सेवा बजावत आहेत. हजारो भाविकांच्या ये-जा मध्येही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, डोळ्यांत भक्ती आणि मनात समर्पण दिसून येते.

या सेवेमुळे कार्यक्रमस्थळावर शिस्त, स्वच्छता आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिथे पादत्राणे काढली जातात, तिथेच अहंकारही उतरवला जातो आणि खरी भक्ती तेव्हाच सुरू होते.

०००००००



हिंद-दी-चादर’ कार्यक्रमात ऑडिओ-व्हिज्युअल कक्ष ठरतोय प्रमुख आकर्षण

 

नवी मुंबई, दि. ०१ :  ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांसाठी विशेष ऑडिओ-व्हिज्युअल कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्याचा, त्यागाचा आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचा इतिहास अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सादर केला जात आहे. हा कक्ष कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.या कक्षात एकावेळी सुमारे १ हजार भाविक बसू शकतील अशी सुसज्ज आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

मोठ्या एलईडी स्क्रीन, ध्वनी व्यवस्था आणि आकर्षक सादरीकरणाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्याचा, त्यागाचा आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचा इतिहास दाखविण्यात येत आहे. या सादरीकरणामुळे भाविकांना त्यांच्या कार्याचा सखोल परिचय होत आहे.

इतिहासाची माहिती केवळ वाचनापुरती मर्यादित न ठेवता, आधुनिक पद्धतीने सादर केल्यामुळे विशेषतः तरुण पिढी मोठ्या उत्साहाने या कक्षाला भेट देताना दिसत आहे. अनेक भाविकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, हा कक्ष कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, मानवता आणि सर्वधर्मसमभावाच्या संदेशाचे प्रभावीपणे प्रसारण होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

00000

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा सूचना जारी

 


हिंगोली (जिमाका), दि. 01 : भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या सूचनांनुसार मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे.

या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचेही सूचित करण्यात आले असून दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखून अधिकृत सूचनांचे पालन करावे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात महाराष्ट्र शासन सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय साधून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

आपत्कालीन संपर्क तपशील :

रामल्ला (पॅलेस्टाईन) – फोन : +970592916418

ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in

दोहा (कतार) – फोन : 00974-55647502

ईमेल : cons.doha@mea.gov.in

रियाध (सौदी अरेबिया) – फोन : 00-966-11-4884697

व्हॉट्सअ‍ॅप : 00-966-542126748 | टोल फ्री : 800 247 1234

ईमेल : cw.riyadh@mea.gov.in

तेल अवीव (इस्रायल) – फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378

ईमेल : cons1.telaviv@mea.gov.in

तेहरान (इराण) – फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात) – टोल फ्री : 800-46342

व्हॉट्सअ‍ॅप : +971543090571

ईमेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in

कुवैत – फोन : +96565501946

ईमेल : community.kuwait@mea.gov.in

बाहरीन – फोन : 00973-39418071

मस्कत – टोल फ्री : 80071234

व्हॉट्सअ‍ॅप : +96898282270

ईमेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in

जॉर्डन – फोन : 00962-770 422 276

बगदाद (इराक) – फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899

वेबसाईट : eoibaghdad.gov.in

ईमेल : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in

अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क क्र. 9405408939 तसेच नियंत्रण कक्ष क्रमांक 8408067158 असे आहेत.


*****

राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्ररथाद्वारे गावागावात जनजागृती

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 अंतर्गंत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी विविध योजनांची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

आज हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे, चोंडी, आंबा, कौठा, वाकोडी, साळवा, तोंडापूर, खांडेगाव, वारंगा, जवळा पांचाळ आदी गावामध्ये चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*****




दोन दिवसीय ‘हिंगोली ग्रंथोत्सवा’चा उत्साहात समारोप

 

* वाचन संस्कृती प्रसाराचा निर्धार


हिंगोली (जिमाका), दि. 01 : येथील कै. रं. रा. बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात आयोजित दोन दिवसीय ‘हिंगोली ग्रंथोत्सवा’चा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक हे होते. 

या समारोप प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, प्रभाकर घुगे, प्रा. जी. पी. मुपकलवार, नामदेव वाबळे, संतोष ससे, कुंडलिकराव सरकटे, सिद्धलिंगअप्पा किर्तनकार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक तसेच सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्रभाकर घुगे यांनी वाचन संस्कृती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ग्रंथोत्सवाची संकल्पना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. ग्रंथोत्सव हा केवळ कार्यक्रम न राहता ‘लोकोत्सव’ बनला पाहिजे, तसेच त्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. यामुळे ग्रंथालय विकासाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय समारोपात खंडेराव सरनाईक यांनी बालकांमध्ये वाचनाची सवय व चळवळ निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. ग्रामीण भागातील वाचनालयांनी बालवाचन कक्ष अधिक समृद्ध करून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावावी, असे त्यांनी आवाहन केले. तसेच ग्रंथोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. विलास खरात यांनी केले. यावेळी ग्रंथविक्रेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, पुस्तके व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात श्रीमती विद्याताई लाखकर यांनी ‘पसायदान’ सादर केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या समारोप कार्यक्रमास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयांचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

*****






बदलत्या सामाजिक परिस्थितीत सार्वजनिक ग्रंथालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची * परिसंवादात मान्यवर वक्त्यांचा सूर

 






हिंगोली (जिमाका), दि. 01 :  बदलत्या सामाजिक परिस्थितीत सार्वजनिक ग्रंथालयांची भूमिका अत्यंत महत्वाचे असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी परिसंवादातून व्यक्त केला.

येथील कै. रं. रा. बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव–2025 अंतर्गत दुसऱ्या दिवशी “बदलती सामाजिक परिस्थिती आणि सार्वजनिक ग्रंथालयांची भूमिका” या विषयावर व्याख्यान उत्साहात पार पडले. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी अशोक अर्धापूरकर होते.

या प्रसंगी प्रा. डॉ. विलास खरात यांनी बदलत्या सामाजिक परिस्थितीत ग्रंथालयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा, विशेषतः एआयचा वापर करून सेवा अधिक प्रभावी व गतिमान करण्याची गरज अधोरेखित केली. भविष्यात ग्रंथालय व्यवस्थापन आणि माहिती सेवा अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाची सांगड घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तर गजानन शिंदे यांनी सार्वजनिक ग्रंथालये ही केवळ पुस्तकांचे भांडार नसून ती माहितीची केंद्रे बनली पाहिजेत, असे मत व्यक्त केले. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एनपीएसएससारखे उपयुक्त ग्रंथ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना विजय जयस्वाल यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासात ग्रंथालयांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. बालपणापासून वाचनाची सवय लावल्यास सामाजिक व सांस्कृतिक जडणघडण अधिक सक्षम होते. यासाठी बालसाहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तर  कल्याण वसेकर यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माहितीची सत्यता व विश्वसनीयता पडताळणे आवश्यक असल्याचे सांगितले. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस एकाकी होत चालला असून सार्वजनिक ग्रंथालये ही लोकसंस्काराची केंद्रे ठरत आहेत. कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी ज्ञानाची दारे खुली करणारी ही ग्रंथालये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वरदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाचन संस्कृती ही व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली असून सखोल विचार आणि विवेक निर्माण करण्याचे कार्य ग्रंथालये करतात, असेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय समारोप करताना अशोक अर्धापूरकर यांनी सार्वजनिक ग्रंथालयांनी विद्यार्थ्यांपर्यंत घरपोच सेवा पोहोचवून वाचनाची गोडी निर्माण करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना सभासद करून घेत त्यांच्या घरापर्यंत पुस्तके उपलब्ध करून देण्यावर भर देत, ग्रंथालयांनी ज्ञानाचा नवा सूर्योदय घडवावा, असे ते म्हणाले. बदलत्या साहित्यिक प्रवाहांचा विचार करून युवक व तरुण पिढीत वाचनाची आवड निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राधिका देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती पारिजात देशमुख यांनी मानले. या व्याख्यानास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयांचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

********

मनरेगा विहीर प्रकरणात अनियमितता, संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आदेश

 


 ·         जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही - जिल्हाधिकारी

 

हिंगोली (जिमाका), दि. 1 : पंचायत समिती सेनगाव अंतर्गत मौजे धनगरवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विहीर कामात अनियमितता व शासकीय निधीचा अपहार झाल्याचे गंभीर प्रकरण निदर्शनास आले आहे. याबाबत शेतकरी रामचंद्र शंकर खडसे यांनी तक्रार केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांची होणारी फसवणूक जिल्हा प्रशासन अजिबात खपवून घेणार नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे.

तसेच दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी या प्रकरणाची बातमी जिल्ह्यातील विविध प्रसार माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर चौकशी समितीमार्फत तात्काळ स्थळ पाहणी करण्यात आली.

या समितीच्या चौकशी अहवालानुसार संबंधित शेतकऱ्याच्या शेतात प्रत्यक्षात कोणतेही विहिरीचे काम झाले नसतानाही अकुशल मजुरीच्या नावाखाली 1 लाख 75 हजार 224 रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे शासन व प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असल्याची नोंद घेण्यात आली आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित तांत्रिक सहाय्यक व ग्रामरोजगार सेवक यांच्यावर गुन्हा दाखल करून अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच संबंधित तांत्रिक सहाय्यक व सहायक कार्यक्रम अधिकारी यांची सेवा समाप्त करून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय गट विकास अधिकारी, सहायक लेखाधिकारी, ग्रामसेवक व इतर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

वरीलप्रमाणे तात्काळ कार्यवाही करून सविस्तर अहवाल विनाविलंब सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना दिले आहेत.

******

 

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

 


हिंगोली (जिमाका), दि. 01 : आज ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वाचन संकृती तसेच सृजनशील लेखन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात मार्गदर्शन करताना वाचन संस्कृती जोपासताना सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन प्रमुख व्याख्यात्यांनी केले. 

येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात हिंगोली ग्रंथोत्सव-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात प्रा. जी. पी. मुपकलवार यांच्या अध्यक्षतेखाली कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वाचन संकृती तसेच सृजनशील लेखन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 


कृत्रिम बुद्धिमत्ता वाचन संस्कृतीला पूरक, पर्याय नाही – डॉ. तुकाराम हापगुंडे


कृत्रिम बुद्धिमत्ता  हे आधुनिक तंत्रज्ञान माहिती मिळविण्यास उपयुक्त असले तरी ते वाचन संस्कृतीचा पर्याय ठरू शकत नाही. ज्ञान प्राप्तीसाठी ग्रंथ वाचन अत्यावश्यक असून, व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन हीच मुख्य प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. तुकाराम हापगुंडे यांनी  हिंगोली येथे आयोजित ग्रंथोत्सवात “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वाचन संस्कृती” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

यावेळी त्यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही माहितीचा स्रोत आहे; मात्र ज्ञानाचा स्रोत नाही. माणसाच्या मेंदू आणि पुस्तक यांच्यातील थेट संवादातूनच खरे ज्ञान निर्माण होते. त्यामुळे वाचनाशिवाय व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. मशीन लर्निंगसारख्या तंत्रज्ञानामुळे माहिती सहज उपलब्ध होत असली तरी त्यातून एकाग्रतेत घट व विचलन वाढण्याचा धोका आहे. ऑडिओ बुक्स किंवा तांत्रिक साधने ही केवळ सहाय्यक भूमिका बजावू शकतात, परंतु सखोल आकलनासाठी प्रत्यक्ष वाचन आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य प्रमाणात वापर करून माहिती संकलन, संदर्भ शोध यासाठी मदत घेता येते; मात्र उर्वरित ज्ञानासाठी ग्रंथ वाचन अपरिहार्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या बदलत्या काळात तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना वाचन संस्कृती जपणे गरजेचे असून, विद्यार्थ्यांनी आणि समाजाने यासाठी सजग प्रयत्न करावेत, असे आवाहनही डॉ. हापगुंडे यांनी यावेळी केले.


सृजनशील लेखनासाठी कल्पनाशक्ती, अनुभव आणि भावना अत्यावश्यक- डॉ. दत्ता सावंत


सृजनशील लेखनासाठी लेखकाकडे समृद्ध कल्पनाशक्ती, जीवनानुभव आणि भावनांची अभिव्यक्ती असणे अत्यावश्यक आहे. कृत्रिम साधनांपेक्षा मानवी संवेदना आणि अंतर्मनातून उमटणारे विचारच खऱ्या साहित्यनिर्मितीचा पाया घालतात, असे प्रतिपादन प्रा. डॉ. दत्ता सावंत यांनी हिंगोली येथे आयोजित ग्रंथोत्सवात “सृजनशील लेखन” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

यावेळी त्यांनी लेखक आजूबाजूच्या घटना, परिस्थिती आणि व्यक्तींचे सूक्ष्म निरीक्षण करून कल्पनाशक्तीच्या आधारे साहित्यनिर्मिती करतो. लेखनात भावना हा केंद्रबिंदू असून वाचकांपर्यंत त्या पोहोचल्या तरच साहित्य प्रभावी ठरते. कोणत्याही साहित्यकृतीमागे ठराविक उद्देश असतो. लेखकाने “मी का लिहितो?” हा मूलभूत प्रश्न स्वतःला विचारणे आवश्यक आहे. तसेच लेखन ही केवळ अभिव्यक्ती नसून मानसिक संतुलन राखण्याचे एक प्रभावी माध्यमही ठरू शकते. साहित्यनिर्मितीसाठी निरीक्षण कौशल्य, अनुभवांचे संकलन आणि भाषेची साधी, सोपी व प्रभावी मांडणी महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. वाचकांना सहज समजेल अशा भाषेत लेखन केल्यास साहित्य अधिक प्रभावीपणे पोहोचते, असेही त्यांनी सांगितले. पात्रनिर्मिती करताना मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण आवश्यक असून, समाजातील वास्तव घटनांवर आधारित साहित्यच वाचकांच्या मनाला भिडते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच साहित्याच्या माध्यमातून समाजातील वास्तव, समस्या आणि मूल्ये प्रभावीपणे मांडता येतात, असेही त्यांनी सांगितले. आजच्या काळात वाढत्या तांत्रिक साधनांमुळे लेखन प्रक्रियेवर परिणाम होत असला तरी सृजनशील लेखनासाठी मानवी अनुभव, चिंतन आणि संवेदनशीलता यांना पर्याय नाही, असे त्यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केले.


वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – प्रा. जी. पी. मुपकलवार


वाचन संस्कृती जोपासण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करणे आवश्यक असून, सृजनशील लेखनासाठी  कल्पनाशक्ती, सूक्ष्म निरीक्षण आणि योग्य भाषेची निवड महत्त्वाची आहे, असे मत प्रा. जी. पी. मुपकलवार यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले.

हिंगोली येथे आयोजित ग्रंथोत्सवात “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वाचन संस्कृती तसेच सृजनशील लेखन” या विषयावरील व्याख्यानाच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. यावेळी त्यांनी  कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती देऊ शकते; मात्र मानवी संवेदना, अनुभव आणि सर्जनशीलता यांना पर्याय ठरू शकत नाही. लेखकासाठी कल्पनाशक्तीबरोबरच सूक्ष्म निरीक्षण अत्यावश्यक असून, योग्य शब्दांची व भाषेची निवड लेखन प्रभावी बनवते. वाचकांना सहज समजेल अशा साध्या व सरळ भाषेत लेखन केल्यास साहित्य अधिक परिणामकारक ठरते. मराठीसह इतर भाषांचे ज्ञानही आवश्यक असून, ज्या भाषेत व्यक्त होणे सोपे वाटते त्या भाषेचा वापर करावा. त्याचबरोबर मराठी भाषेचा प्रसार व जतन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. वाचन केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, तसेच शब्दसंग्रह वाढत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे साहित्य  कथा, कादंबऱ्या, कविता यांचे नियमित वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले. वाचनातूनच विचारशक्ती, आकलन क्षमता आणि व्यक्तिमत्व विकास साध्य होतो, असेही त्यांनी नमूद केले. लेखन ही केवळ अभिव्यक्ती नसून मानसिक समाधान व आत्मविकासाचे साधन असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजातील वास्तव समजून घेण्यासाठी आणि योग्य विचार मांडण्यासाठी साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रा. मुपकलवार यांनी अधोरेखित केले.

या व्याख्यानाचे सूत्रसंचालन गोडाती काळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन रतन आडे यांनी केले. या व्याख्यान कार्यक्रमास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

******