हिंगोली (जिमाका), दि. 1 : पंचायत समिती
सेनगाव अंतर्गत मौजे धनगरवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत
करण्यात आलेल्या विहीर कामात अनियमितता व शासकीय निधीचा अपहार झाल्याचे गंभीर प्रकरण
निदर्शनास आले आहे. याबाबत शेतकरी रामचंद्र शंकर खडसे यांनी तक्रार केली होती. त्यामुळे
जिल्ह्यातील शेतक-यांची होणारी फसवणूक जिल्हा प्रशासन अजिबात खपवून घेणार नसल्याचे
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे.
तसेच दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी या
प्रकरणाची बातमी जिल्ह्यातील विविध प्रसार माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर चौकशी समितीमार्फत
तात्काळ स्थळ पाहणी करण्यात आली.
या समितीच्या चौकशी अहवालानुसार संबंधित
शेतकऱ्याच्या शेतात प्रत्यक्षात कोणतेही विहिरीचे काम झाले नसतानाही अकुशल मजुरीच्या
नावाखाली 1 लाख 75 हजार 224 रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकारामुळे शासन व प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असल्याची नोंद घेण्यात आली आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे
निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित तांत्रिक सहाय्यक व ग्रामरोजगार सेवक यांच्यावर
गुन्हा दाखल करून अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच संबंधित तांत्रिक सहाय्यक व सहायक
कार्यक्रम अधिकारी यांची सेवा समाप्त करून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश
देण्यात आले आहेत. याशिवाय गट विकास अधिकारी, सहायक लेखाधिकारी, ग्रामसेवक व इतर संबंधित
अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
वरीलप्रमाणे तात्काळ कार्यवाही करून सविस्तर अहवाल विनाविलंब सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना दिले आहेत.
******
No comments:
Post a Comment