हिंगोली (जिमाका), दि. २६ : हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही समाजमाध्यमांवर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असून रांगा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाला आहे.
ही परिस्थिती लक्षात घेऊन सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी आदेश जारी केले आहेत.
यानुसार दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त रुपये २००/- पर्यंतच इंधन भरण्यात यावे, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त रुपये २०००/- पर्यंतच इंधन देण्यात यावे. कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या, ड्रम इत्यादीमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
नागरिकांनी अनावश्यक गर्दी व रांगा टाळून आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स) व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोज आपल्या पंपावरील उपलब्ध शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला साठा व मागणी केलेला साठा याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील. सर्व पेट्रोल पंप धारकांनी या आदेशांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ नुसार कडक कारवाई करण्यात येईल. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे.
*******
No comments:
Post a Comment