24 March, 2026

युवक नेतृत्व शिबिर उत्साहात

 

हिंगोली (जिमाका), दि. २४ :  येथील संत श्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे कला व विज्ञान महाविद्यालयात जिल्हास्तरीय (हिंगोली व परभणी) युवक-युवती नेतृत्व विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहीद दिनानिमित्त क्रांतिकारक भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहीद दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन या उपक्रमाचे आयोजन केंद्र शासनाच्या “माय भारत” केंद्र, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, संत श्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय निलावार, संगणक तज्ञ प्रा. विजयकुमार कांबळे, नितीन चोंढेकर व समाजसेवक गणेश साहू उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन व शहीदांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. विजय निलावार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांचा विकास होतो, असे सांगून “माय भारत” केंद्राच्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. लक्ष्मणराव पठाडे यांनी युवक नेतृत्व विकासाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रा. विजयकुमार कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी संगणकीय युगात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचे महत्त्व ओळखून मोबाईलचा वापर मर्यादित ठेवत वाचनाची सवय वाढवावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. माणिक ढोकळे होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ, महाविद्यालय व “माय भारत” केंद्राच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. प्रभाकर कऱ्हाळे, प्रा. विक्रम भगत, प्रा. माया जाधव, प्रा. विद्या मोरे, प्रा. तेजश्री सिंगन पालकर, प्रा. शुभांगी तगलपलेवार, एनएसएस प्रमुख प्रा. सुभाष चव्हाण तसेच इतर प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन अशोक लोंढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. विक्रम भगत यांनी केले.

*******

No comments: