हिंगोली (जिमाका), दि. 27 : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडागुण सवलतीअंतर्गत वाढीव गुण देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने संबंधित क्रीडा संघटनांनी विविध स्तरावर आयोजित केलेल्या स्पर्धांचा सविस्तर अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
तथापि, अनेक क्रीडा संघटनांकडून स्पर्धांचे अहवाल केवळ आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्याकडेच सादर केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे संबंधित प्रस्ताव प्राप्त न झाल्याने खेळाडू विद्यार्थ्यांच्या क्रीडागुण प्रस्तावांची पडताळणी व शिफारस करणे शक्य होत नाही. परिणामी, पात्र असूनही अनेक विद्यार्थ्यांना क्रीडागुण सवलतीपासून वंचित राहावे लागते.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व एकविध क्रीडा संघटनांनी सन 2025-26 या वर्षात आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धांचा अहवाल दि. 06 एप्रिल, 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अहवालासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र (1860 व 1950 कायद्यांनुसार), राज्य संघटनेचे संलग्नता पत्र, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचा सविस्तर अहवाल, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचा अहवाल (सहभागी संघ, खेळाडू यादी, लॉट्स व अंतिम निकालासह) आदी कागदपत्रे जोडणे अनिवार्य राहील.
सर्व संबंधित क्रीडा संघटनांनी वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रांसह अहवाल निर्धारित मुदतीत सादर करून त्यांच्या संघटनेतील पात्र खेळाडू विद्यार्थी क्रीडागुण सवलतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. निलकंठ श्रावण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment