02 March, 2026

होळी व रंगपंचमी प्राणीमित्र पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 02 : होळी हा आनंद, मैत्री आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला सण असून यंदा ४ मार्च २०२६ रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जीव जंतू कल्याण बोर्ड यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांनी होळी व रंगपंचमी प्राणीमित्र पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन, हिंगोली यांनी केले आहे.

सणांच्या काळात भटके कुत्रे, मांजर, गुरे, पक्षी तसेच पाळीव प्राणी यांना मोठा आवाज, रंग, पाण्याचे फुगे आणि गर्दीमुळे ताण व भीती निर्माण होऊ शकते. रासायनिक रंगांमुळे त्यांच्या त्वचेवर व डोळ्यांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

प्राण्यांना त्रास देणे हे ‘प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्ट, १९६०’ अंतर्गत दंडनीय गुन्हा असून सण दयाळूपणे साजरा करणे हे कायदेशीर तसेच नैतिक कर्तव्य आहे.

प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती व जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना पुढील बाबींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

प्राण्यांवर सुका किंवा ओला रंग लावू नये. पाण्याचे फुगे फेकणे किंवा रंगीत पाणी उडवणे टाळावे. पाळीव प्राणी सुरक्षित व शांत ठिकाणी ठेवावेत. सणानंतर परिसर स्वच्छ ठेवून प्लास्टिक, रंगांचे अवशेष यांची योग्य विल्हेवाट लावावी. लहान मुले व नागरिकांमध्ये प्राणीमित्र होळीबाबत जनजागृती करावी. प्राण्याला दुखापत झाल्यास तत्काळ स्वच्छ पाण्याने धुऊन पशुवैद्यकीय मदत घ्यावी.

केवळ नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक सण साजरा करावा. उत्साहाबरोबरच सहानुभूती आणि दयाळूपणाला प्राधान्य देत कोणत्याही सजीव प्राण्याला इजा होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. 

“सुरक्षित खेळा, दयाळूपणे खेळा आणि क्रूरतेशिवाय होळी साजरी करा,” असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, हिंगोली यांनी केले आहे.

******

No comments: