• 'माविम'चा ५१ वा वर्धापन दिन व जागतिक महिला दिनानिमित्त ‘नारीशक्ती सन्मान सोहळा’ उत्साहात
हिंगोली, दि. ८ (जिमाका): महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कार्यरत सर्व महिला बचत गटांनी उद्योग-व्यवसाय उभारून नवनवीन उत्पादने तयार करावीत. तसेच लोक संचालित साधन केंद्रनिहाय विविध उद्योगांचे क्लस्टर उभारल्यास महिलांना व्यवसायवृद्धीस मोठी संधी मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे आज रविवार (दि. ८) रोजी ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त व जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘नारीशक्ती सन्मान सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे उपस्थित होते.
हिंगोली जिल्हा देशातील हळद उत्पादनात महत्त्वाचा वाटा उचलत असून महिलांनी हळदीपासून केवळ पावडर नव्हे तर इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यावर भर देण्याचे आवाहन करून बचत गटांना आवश्यकतेनुसार प्रशासनाकडून सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून अधिक सक्षम होणे गरजेचे असल्याचे सांगितले. संविधानामुळे महिलांना विविध अधिकार प्राप्त झाले असून शिक्षणामुळे महिलांचे व कुटुंबाचे सशक्तीकरण होते, असेही त्यांनी नमूद केले.
जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व लोकसंचलित साधन केंद्रांच्या अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक करताना जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास सांगितला. जिल्ह्यातील १५४१ बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे संघटन करण्यात आले असून चालू आर्थिक वर्षात सीएमआरसीच्या माध्यमातून आतापर्यंत ३० कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. तर वैयक्तिक महिलांना सुमारे ३९ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील बचत गटांची कर्ज परतफेडीची सरासरी ९९ टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते अधिक कर्ज मिळालेल्या बचत गटांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट उद्योजक महिलांचाही सन्मान करण्यात आला.
अधिक कर्ज मिळालेल्या गटांमध्ये भगवान महावीर, भक्ती कवठा, तनिष्का जवळाबाजार, कल्पतरू चोंडी स्टेशन, लक्ष्मी वसमत, अंजनी असोला, महाकाली माता औंढा, ज्योती हिंगोली व स्वामी नरेंद्र हिंगोली या स्वयंसहायता महिला बचत गटांचा समावेश होता. उत्कृष्ट उद्योजक महिलांमध्ये प्रभावती प्रकाश काचगुंडे (अंजनवाडा), स्वाती प्रकाश चोंडेकर (औंढा नागनाथ), उषा प्रकाश खडसे (हिंगोली), संगीता सिताराम दुधाने (साखर कारखाना), साधना गोविंद कदम (अकोली), विजया धोंडीबा कटारे (जवळा बाजार) व अरुणा दलित खंदारे (वाई) यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात महिलांनी मनोगत व्यक्त करत महिला आर्थिक विकास महामंडळामुळे त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांविषयी अनुभव सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लेखाधिकारी मुकुंद जहागीरदार, जिल्हा प्रकल्प सल्लागार गजानन खिरोडकर, एमआयएस अधिकारी गजानन इंगळे, लिपिक तथा सहाय्यक संतोष ठाकूर, तसेच लोकसंचलित साधन केंद्रातील व्यवस्थापक व अधिकारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील चव्हाण यांनी केले तर आभार विलास पंडित यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकसंचलित साधन केंद्रांमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
******





No comments:
Post a Comment