हिंगोली (जिमाका), दि. 31 : हवामानातील
वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड व नैसर्गिक आपत्तीमुळे पारंपारिक कोरडवाहू शेतीसमोर
गंभीर आव्हाने निर्माण झाली असून उत्पादन खर्चही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागांतर्गत
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत “हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान” राबविण्यात येत आहे. शेतीचा उत्पादन
खर्च कमी करणे व प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची हमी देणे हा या अभियानाचा
मुख्य उद्देश आहे.
या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी
कृषी विभागाबरोबरच कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन
विभाग आदी यंत्रणांचा सक्रिय सहभाग आहे. या अभियानांतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा
प्रसार करण्यासाठी “विशेष डिजिटल शेती शाळा” आयोजित करण्यात येत आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
व पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल 2026 महिन्यात चार विशेष डिजिटल
शेती शाळांचे आयोजन करण्यात आले असून विविध पिक पद्धतींसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची
माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शेती शाळांमध्ये कृषी तज्ञ
व प्रगतशील शेतकऱ्यांमार्फत ज्ञानाचे आदान-प्रदान होणार आहे.
शेतीशाळांचे वेळापत्रक
व विषय पुढीलप्रमाणे :
* शेतीशाळा 1 (1 एप्रिल 2026) : पेरणीपूर्व तंत्रज्ञान
– बेड तयार करणे, बेडवर टोकण, शून्य/कमी मशागत, आंतरपीक पद्धत, बियाणे उगवण क्षमता
तपासणी व बीजप्रक्रिया.
* शेतीशाळा 2 (8 एप्रिल 2026) : जैविक व नैसर्गिक
निविष्ठा उत्पादन – बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा तयार
करण्याच्या पद्धती व फायदे.
* शेतीशाळा 3 (15 एप्रिल 2026) : एकात्मिक कीड व्यवस्थापन
– सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र किटक संवर्धन, लिंबोळी व दशपर्णी अर्काचा
वापर.
* शेतीशाळा 4 (22 एप्रिल 2026) : भात शेतीसाठी सुधारित
लागवड तंत्र – थेट पेरणी (डीएसआर), श्री पद्धत व यांत्रिकी लागवड पद्धती.
सर्व शेतीशाळा नमूद तारखांना सायंकाळी
7.30 वाजता सुरू होणार असून कृषी विभाग, नानाजी
देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन व उमेद यांच्या युट्यूब (YouTube) चॅनेलवरून
थेट प्रक्षेपण (LIVE) करण्यात येणार आहे.
शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक
कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बीज उत्पादक, तसेच फार्मर कप स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे
शेतकरी गट व वनपट्टाधारक यांनी मोठ्या संख्येने या डिजिटल शेती शाळांमध्ये सहभागी व्हावे,
असे आवाहन कृषी विभाग व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत करण्यात आले आहे.
*******
No comments:
Post a Comment