हिंगोली(जिमाका), दि. 16 : रेशीम संचालनालय, नागपूर अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली यांच्या मार्फत जिल्ह्यात दि. 4 फेब्रुवारी 2026 पासून महारेशीम अभियान राबविण्यात येत असून या अभियानास जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते रेशीम रथास हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली.
अभियान सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील 120 शेतकऱ्यांनी नोंदणी फी भरून रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाकडे नोंदणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेशीम उद्योगाबाबत शेतकऱ्यांमध्ये वाढता उत्साह दिसून येत आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील 78 गावांमध्ये एकूण 447 शेतकऱ्यांनी सुमारे 454 एकर क्षेत्रावर तुती लागवड केलेली आहे. यापैकी अनेक शेतकरी वर्षाला 4 ते 5 किटक संगोपनाच्या बॅच घेऊन त्यातून दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पादन घेऊन चांगले उत्पन्न मिळवत आहेत. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही किमान एक एकर तुती लागवड करून आपले वार्षिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाकडे आपले सरकार पोर्टल मार्फत किंवा काही अडचण असल्यास ऑफलाईन पद्धतीने जिल्हा रेशीम कार्यालयात नोंदणी करून तुती लागवड करावी. नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांना तुती लागवड, किटक संगोपन गृह, साहित्य आदी बाबींसाठी शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (म.न.रे.गा.), सिल्क समग्र व पोकरा योजनेंतर्गत लाभ देण्यात येत आहे.
म.न.रे.गा. योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये तुती लागवड करून यशस्वीपणे कोष उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी सुमारे 4.32 लाख रुपये अनुदान देय आहे. तसेच इतर योजनांमधूनही या उद्योगासाठी अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
*******
No comments:
Post a Comment