• जागतिक महिला दिनानिमित्त उत्कृष्ट महिला पुरस्कार वितरण सोहळा
• वर्षभरात लाखभर लखपती दिदी करण्याचा संकल्प
हिंगोली, दि. ८ (जिमाका) : महिलांना त्यांच्या कुटुंबातून पाठबळ मिळाल्यास त्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वीपणे पुढे प्रगती साधतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आज येथे केले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
येथील षटकोणी सभागृहात महिला व बालकल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, समाज कल्याण अधिकारी श्रीमती गीता गुठ्ठे, जिल्हा कृषि अधिकारी अतुल वायसे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड व्यासपीठावर उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यात १,०७२ अंगणवाड्या कार्यरत असून, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका उत्कृष्ट कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे सांगून ते म्हणाले की, जिल्ह्यात सुमारे १०,६०० बचत गट कार्यरत असून ८४ हजार लखपती दीदी तयार झाल्या आहेत. पुढील वर्षात हा आकडा एक लाख लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. बचत गटांनी व्यवसायाकडे वळत यावर्षी सुमारे ३० लाख रुपयांची उलाढाल केली असून, अशा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचाही सन्मान व्हायला हवा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सांगितले.
राजमाता जिजाऊ, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यापासून ते आजपर्यंत महिलांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे ज्या-ज्या क्षेत्रात महिला काम करतात, त्या सर्वांचे योगदान मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानात घेऊन गावांनी १०० टक्के गुण मिळवून पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच माझे गाव – आरोग्य संपन्न गाव या अभियानात महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन गावांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेबाबतही त्यांनी माहिती दिली. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी ही मोहीम महत्त्वाची असून १४ वर्षे पूर्ण व १५ वा वाढदिवस न साजरा केलेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्याचे पालकांनी सुनिश्चित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
भाषणाच्या शेवटी त्यांनी तसेच ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ही कविता सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रशासनात काम करताना शासनाने दिलेल्या जबाबदाऱ्यांबरोबरच आपल्या मुलींची व कुटुंबाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महिला आई, पत्नी, बहीण, मैत्रीण अशा विविध भूमिकांतून समाज घडवितात, असे सांगून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या.
प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी स्त्रीशक्तीचा जागर म्हणून जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले. नवनिर्मितीची शक्ती महिलांमध्ये असून आईकडून शिकलेली भाषा हीच मातृभाषा असते, असे सांगत, इतिहासापासून आजच्या आधुनिक काळापर्यंत महिलांनी देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले असल्याचे प्रकल्प संचालक श्री. केंद्रे यांनी सांगितले.
समाज कल्याण अधिकारी श्रीमती गीता गुठ्ठे यांनीही आपल्या मनोगतातून सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे यांनी प्रास्ताविकातून महिला घर सांभाळून समाजातील विविध जबाबदाऱ्या पार पाडतात. समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्या कुटुंबासाठी तसेच राष्ट्रहितासाठी प्रेरणादायी कार्य करत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी विवेक वाकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध विभागांतील महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
*************




No comments:
Post a Comment