हिंगोली (जिमाका), दि. 11 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील 22 वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते दि. 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्योती-बिष्णु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, खानापारा, गुवाहाटी (आसाम) येथून वितरित करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार मिळावा यासाठी फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाते.
या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत 21 हप्त्यांद्वारे सुमारे 39 हजार 300 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. सद्यस्थितीत भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधाराशी संलग्न करणे व ई-केवायसी प्रमाणिकरण या तीन अटी पूर्ण केलेल्या 91.19 लाख शेतकरी कुटुंबांना 13 मार्च रोजी सुमारे 1 हजार 837 कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राज्यातील कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा व तालुका स्तरावरील कृषी कार्यालये, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC), शेतकरी उत्पादक संघटना (FPO) तसेच सहकारी पतसंस्था (PACS) येथे आयोजित करण्यात येणार आहे. नागरी सुविधा केंद्रांवरूनही या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.
कृषी विभाग, महसूल व वन विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून https://pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. या कार्यक्रमात राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment