• 20 मार्च नंतर कोणतीही त्रुटी पूर्तता स्वीकारली जाणार नाही
हिंगोली (जिमाका), दि. 4 : शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ अंतर्गत अर्ज केलेल्या व (सेंड-बॅक) त्रुटीत आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जातील त्रुटी दिनांक 20 मार्चपूर्वी ऑनलाईन पद्धतीने पूर्ण कराव्यात, अशी अंतिम सूचना समाज कल्याण विभागामार्फत देण्यात आली आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असूनही प्रवेश न मिळालेल्या किंवा विविध कारणांमुळे प्रवेश न घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2025 पर्यंत स्वीकारण्यात आले होते. हिंगोली जिल्ह्यातून एकूण 2896 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 255 अर्ज विविध त्रुटींमुळे संबंधित विद्यार्थ्यांकडे परत पाठवण्यात आले आहेत.
संबंधित विद्यार्थ्यांनी पोर्टलवर लॉगिन करून अर्जातील त्रुटी तात्काळ दुरुस्त कराव्यात. 20 मार्चनंतर कोणतीही त्रुटी पूर्तता स्वीकारली जाणार नाही. तसेच अपूर्ण किंवा त्रुटीपूर्ण अर्ज कायमस्वरूपी नाकारले जातील व त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील. शासन निर्णयानुसार एकदा नाकारलेले अर्ज पुन्हा विचारात घेण्याची तरतूद नाही.
म्हणून सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी वेळेत त्रुटी पूर्तता करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
******
No comments:
Post a Comment