04 March, 2026

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ सुरू

 

• हिंगोली तालुक्यात महसूल मंडळनिहाय समाधान शिबिराचे आयोजन



हिंगोली (जिमाका), दि. 4 : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी शासनाच्या निर्णयानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा-1)’ हिंगोली तालुक्यात महसूल मंडळनिहाय राबविण्यात येत आहे.

या समाधान शिबिरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी संबंधित मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची सेवा निश्चित दिनांकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याअंतर्गत कनेरगांव नाका व सिरसम बु. मंडळ विभागात 7 मार्च, बासंबा मंडळात 14 मार्च, भांडेगाव येथे 10 एप्रिल, डिग्रस कऱ्हाळे येथे 17 एप्रिल, खानापूर चित्ता येथे 24 एप्रिल, नर्सी नामदेव येथे 2 मे, हिंगोली शहर मंडळात 8 मे आणि हिंगोली ग्रामीण मंडळात 15 मे 2026 रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रांचे वितरण, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान योजना, तक्रार निवारण आदी महसूल विभागाच्या विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तसेच नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल प्रशासनाशी संबंधित दैनंदिन प्रश्न स्थानिक स्तरावर निकाली काढणे, संजय गांधी निराधार योजनेसारख्या अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, गरजू लाभार्थ्यांना ई-शिधापत्रिका तसेच डिजिटल सातबारा व आठ अ उतारे उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना जलद व सुलभ सेवा पुरविण्यावर भर देण्यात येणार असून, हिंगोली तालुक्यातील सर्व नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिल कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

********

No comments: