28 March, 2026

विशेष लेख- १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान : जिल्हा परिषद यंत्रणेच्या एकत्रित प्रयत्नांची राज्यस्तरीय पावती

 


मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा, एक ऐतिहासिक पार्श्वभूमी, धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेला जिल्हा म्हणून हिंगोलीकडे पाहिले जाते. परंपरागत कार्यशैलीतून कार्यरत असलेली येथील जिल्हा परिषद. पण राज्यशकट हाकला जाणा-या मंत्रालयातून थेट हिंगोलीसारख्या तुलनेने मागास भागात एका आयएएस अधिका-याची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली होते अन् मग प्रवास सुरु होतो एका नव्या सकारात्मक भावनेचा, आशेचा...! नागरिकांना ओळख होते जलद, गतिमान आणि कार्यक्षम बदलाची.... ते यंत्रणेकडून करून घेणा-या खमक्या अधिका-याची....!!!

त्या सकारात्मक भावना, आशा सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण करतात ते येथील मुख्य कार्यकारी अधिकारी. ज्यांना देशाची आर्थिक राजधानी असणा-या आणि संपूर्ण राज्याचे आर्थिक नियोजन करण्याचा वित्त विभागातील अनुभव असतो, त्या  अधिका-याची बदली होते अन् मग लगेच प्रशासनात सकारात्मक बदल जाणवायला लागतात. मंत्रालयात कामाचा आणि उपस्थितीच्या वेळा पाळण्याची शिस्त असलेल्या प्रमुख अधिका-यामुळे सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचा-यांनाही वेळ पाळण्याची शिस्त लागते. त्यामुळे हिंगोली जिल्हा परिषदेत गेल्या काही महिन्यांत झालेल्या सकारात्मक बदलांकडे पाहिल्यास, एक सक्षम नेतृत्व, ठोस नियोजन आणि पारदर्शक प्रशासन यांचे प्रभावी उदाहरण दिसून येते. या बदलांच्या केंद्रस्थानी आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड. ज्यांनी आपल्या कार्यपद्धतीने संपूर्ण यंत्रणेलाच नवा चेहरा दिला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रम’ अंतर्गत उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी केल्याबद्दल विवेक गायकवाड यांचा आज‌ शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. हा सन्मान केवळ एका अधिकाऱ्याच्या कार्याची दखल नसून, हिंगोली जिल्हा परिषद यंत्रणेच्या एकत्रित प्रयत्नांची राज्यस्तरीय पोचपावती आहे.

या १५० दिवसांच्या मोहिमेत प्रशासनातील गती, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रशासकीय कामे निश्चित वेळेत पूर्ण करण्याचा ध्यास घेण्यात आला. परिणामी, यंत्रणेमध्ये शिस्त, विश्वासार्हता आणि उत्तरदायित्व यांची नवी जाणीव निर्माण झाली.

सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठता याद्या अद्ययावत करून त्या प्रसिद्ध करण्यात आल्या, ही एक महत्त्वपूर्ण बाब ठरली. पदोन्नती प्रक्रियेला वेग देत पात्र कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात आला. त्याचबरोबर सरळसेवेतील रिक्त पदे भरून मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यात आली. बिंदुनामावलीचे अद्ययावत प्रमाणिकरण केल्यामुळे आरक्षण व सेवा विषयक बाबींमध्ये पारदर्शकता अधिक दृढ झाली.

अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्याही तत्परतेने पूर्ण करण्यात आल्या. यामुळे संबंधित कुटुंबांना तातडीचा आधार मिळाला, जे प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे द्योतक आहे. या सर्व उपाययोजनांमुळे कर्मचारी व नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण झाला.

केंद्र शासनाच्या I-GOT कर्मयोगी पोर्टलच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीवर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान पाच प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे त्यांच्या कामकाजात गुणवत्ता, शिस्त आणि सेवाभिमुखता वाढली. ही बाब प्रशासनाच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.

यासोबतच, सेवा पुस्तिकांचे अद्ययावत संगणकीकरण हा एक दूरदृष्टीचा निर्णय ठरला. यामुळे सेवा नोंदी अचूक, सुलभ आणि पारदर्शक झाल्या असून भविष्यातील निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान आणि विश्वासार्ह होणार आहे.

हिंगोली जिल्हा परिषदेला मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान म्हणजे प्रभावी नियोजन, विभागांतील समन्वय, वेळेचे काटेकोर पालन आणि उद्दिष्टपूर्ती यांचा संगम आहे. विवेक गायकवाड यांनीही हा गौरव संपूर्ण यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे नमूद करत सांघिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

आज हिंगोली जिल्हा परिषद प्रशासन हे पारदर्शक, गतिमान आणि परिणामकारक कार्यपद्धतीचे एक आदर्श उदाहरण म्हणून पुढे येत आहे. या यशामुळे इतर जिल्ह्यांसाठी एक प्रेरणादायी मार्ग तयार झाला आहे. भविष्यातही नागरिकाभिमुख, दर्जेदार आणि उत्तरदायी सेवा देण्याचा संकल्प या निमित्ताने अधिक दृढ झाला आहे.

एकंदरीत, विवेक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्हा परिषद यंत्रणेचा ‘आरसा’च बदलला असून, प्रशासनातील उत्कृष्टतेचा हा प्रवास पुढील काळातही असाच सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


- प्रभाकर बारहाते 

- प्र. जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली

******

No comments: