24 March, 2026

आगामी खरीप हंगामात केव्हीके तोंडापूर ‘ड्रोन हब’ * नरचर एरोस्पेससोबत सामंजस्य करार

   


हिंगोली (जिमाका), दि. २४ : आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), तोंडापूर व नरचर एरोस्पेस (ड्रोन निर्मिती संस्था) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, आगामी खरीप हंगामात केव्हीके तोंडापूर हे जिल्ह्याचे ‘ड्रोन हब’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

संत नामदेव सेवाभावी संस्था संचलित केव्हीके तोंडापूरकडून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे व शेती अधिक कार्यक्षम करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या करारामुळे ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीतील फवारणी अधिक अचूक व परिणामकारक होणार असून, मजुरीवरील खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

माजी खासदार ॲड. शिवाजीराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर थेट फवारणी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच ग्रामीण भागात ड्रोन तंत्रज्ञानाबाबत जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

आगामी खरीप हंगामात कीड व रोग नियंत्रणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे आधुनिक शेतीला चालना मिळून उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

याबाबत बोलताना वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी सांगितले की, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करणे व शेती अधिक कार्यक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतीला नवी दिशा मिळेल.

या प्रसंगी नरचर एरोस्पेसचे प्रतिनिधी आदित्य तकते, केव्हीकेचे विषय विशेषज्ञ राजेश भालेराव (कृषि विद्या), अजयकुमार सुगावे (पिक संरक्षण), डॉ. अतुल मुराई (कृषि विस्तार), साईनाथ खरात, डॉ. कैलास गीते तसेच केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक व अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

***** 



No comments: