14 March, 2026

हिंगोली येथील लोकन्यायालयामध्ये ५ कोटी ५८ लाख ९१ हजार रुपयांची १३१ प्रकरणे निकाली




हिंगोली (जिमाका), दि. १४ : येथील तालुका विधी सेवा समितीच्या वतीने सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय मुंबई तसेच जिल्हा न्यायालय परभणी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील न्यायालयात दि. १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. श्रीधर आर. घुगे, सचिव अॅड. मिलींद कांबळे तसेच जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी व विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या लोकन्यायालयात प्रलंबित असलेली ५०१ प्रकरणे तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची वाद दाखलपूर्व ३ हजार ६२७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित १२८ प्रकरणे व दाखलपूर्व ३ प्रकरणे अशी एकूण १३१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या लोकअदालतीत प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये तडजोडीच्या आधारे एकूण ५ कोटी ५८ लाख ९१ हजार ६५३ रुपये इतक्या रकमेवर समझोता करण्यात येऊन संबंधित प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथील न्यायिक अधिकारी व विधीज्ञ यांचा समावेश असलेली एकूण सहा पॅनल गठीत करण्यात आली होती.

या पॅनलचे प्रमुख म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती एस. एन. माने-गाडेकर (जिल्हा न्यायाधीश-१), आर. एस. रोटे (तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२), पी. जी. महाळंकर (२रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर), श्रीमती पी. आर. पमनानी (दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर), श्रीमती डी. व्ही. भंडारी (२रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर) व श्रीमती एस. एस. पळसुळे (तिसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर) यांनी कामकाज पाहिले.


*अपघातातील मृत्यू प्रकरणात ५७ लाखांची नुकसानभरपाई*


या लोकन्यायालयात एक वर्षापूर्वी झालेल्या अपघातात समरजितसिंग रघुवंशी यांचे निधन झाले होते. त्यांच्या पत्नी आरती रघुवंशी यांनी नुकसानभरपाईसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरण तडजोडीने निकाली निघून लिबर्टी जनरल इन्शुरन्स कंपनीकडून त्यांना ५७ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या हस्ते त्यांना धनादेश प्रदान करण्यात आला. हे प्रकरण आर. एस. रोटे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ यांच्या पॅनलवर निकाली काढण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी पुढील दि. ९ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून ती तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन केले आहे.

*******

No comments: