06 March, 2026

‘लिगो इंडिया’ प्रकल्पातील विकासकामांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा

 


हिंगोली दि.06, (जिमाका): जिल्ह्यातील दुधाळा येथे चार वर्षाच्या कालमर्यादेत गुरुत्वाकर्षण-लहरींचा अभ्यास करणारी अत्याधुनिक वेधशाळा ‘लिगो इंडिया’ अंतर्गंत येणाऱ्या विविध विकासप्रकल्पांचा आढावा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज येथे घेतला. यावेळी लिगो इंडिया या प्रकल्पाच्या विकासाकामांची प्रगती ही समाधानकारक असून, विहित कालावधीत कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधितांना दिले.  

यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राजेश सरवदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुदेश देशमुख, तहसीलदार हरिष गाडे, लिगो इंडियाचे संचालक के. महापात्रा, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख प्रशांत बिलोलीकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता एन. डी. कोकडवार यांच्यासह लार्सन अँड टुब्रोची टेक्निकल टीम यावेळी उपस्थ‍ित होते.

            अमेरिका-भारत-जर्मनी-ऑस्ट्रेलिया-यूके यांच्या सहकार्याने पुढील चार वर्षांत बांधण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी लागणारे अतिरिक्त भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक पार पडली. या प्रकल्पाच्या कामकाजासाठी आवश्यक भूसंपादन मोजणी पुढील सात दिवसांमध्ये करण्याचे संबंधित यंत्रणेला निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. लिगो इंडिया या प्रकल्पातून यापूर्वी गेलेल्या विविध नागरी सुविधांचे कार्यान्वयन करणाऱ्या यंत्रणांनी त्या सोयी-सुविधा प्रकल्पाच्या बाहेरील परिसरातून वळविण्यात याव्यात. तसेच या कामासाठी लागणाऱ्या अतिरिक्त भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे काम 2030 पर्यंत पूर्ण होऊन तो प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. हा प्रकल्प जगातील सर्वात संवेदनशील इंटरफेरोमीटरपैकी एक राहणार असून, तो खगोल भौतिकशास्त्रातील संशोधनाचे एक प्रमुख केंद्र असेल. भविष्यात या प्रयोगशाळेतून वैश्विक घटनांमुळे निर्माण होणाऱ्या गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध घेता येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.

 भारताचा अणुऊर्जा विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग युनायटेड स्टेट्समधील लिगो प्रयोगशाळेच्या सहकार्याने या प्रकल्पावर काम सुरु आहे. जगभरातील लिगो वेधशाळांच्या जागतिक नेटवर्कमध्ये हे पाचवे राहणार आहे. हा प्रकल्प खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील भारताच्या क्षमता वाढवेल आणि तरुणांना या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रेरित करेल. त्यामुळे या प्रकल्पाची सर्व प्रकिया तात्काळ पूर्ण करण्याबाबत आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

***** 




No comments: