हिंगोली (जिमाका), दि. 27 : फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुण सवलतीच्या प्रस्तावांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य मंडळ सचिवांच्या सूचनेनुसार क्रीडा सवलतीचे प्रस्ताव आपले सरकार पोर्टलवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in या लिंकद्वारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परीक्षांचे निकाल लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी करून ते विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात येणार आहेत. सर्व प्रस्ताव दि. 15 एप्रिल 2026 पर्यंत स्वीकारण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अर्ज भरताना काही अडचण आल्यास संबंधित पोर्टलवरील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही सूचित करण्यात आले आहे.
क्रीडा प्रस्ताव सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्यास प्रस्ताव अपात्र ठरविण्यात येऊ शकतो. अशा वेळी त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव पुन्हा सादर करण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थी, शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांची राहील. तसेच अपात्र प्रस्ताव ऑनलाईन प्रणालीत दिसत नसल्याने मुदतीनंतर ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची वेळ येऊ शकते, याची नोंद घ्यावी.
जिल्ह्यातील एकही खेळाडू क्रीडा गुण सवलतीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
********
No comments:
Post a Comment