31 March, 2026

विविध कृषी पुरस्काराचे अर्ज सादरीकरणास 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि.31 : महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी करण्यात येतो.

यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करून संबंधितांचा गौरव करण्यात येतो.

यापूर्वी हे पुरस्कार अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते. मात्र, प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलन प्रक्रियेत होणारा विलंब तसेच शेतकऱ्यांना होणारा खर्च लक्षात घेता ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व वेळबद्ध करण्यासाठी कृषी विभागामार्फत स्वतंत्र ऑनलाईन संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये अर्ज सादर करता येणार आहेत.

प्रणालीद्वारे अर्ज सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन व अहवाल निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविण्यात येणार असून यामुळे कार्यक्षमता व विश्वासार्हता वाढणार आहे.

सन 2025 साठी विविध कृषी पुरस्कार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 31 मार्च 2026 निश्चित करण्यात आली होती. मात्र, ऑनलाईन प्रणालीचे हे पहिले वर्ष असल्याने तसेच अर्जासाठी आवश्यक असलेला जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी दाखला मिळण्यास विलंब होत असल्याने काही अर्ज प्रलंबित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी व क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त मागण्यांचा विचार करून कृषी विभागाने अर्ज सादरीकरणास मुदतवाढ दिली आहे.

त्यानुसार, सन 2025 साठी विविध कृषी पुरस्कार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता दि. 15 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था व गट यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

*******

No comments: