हिंगोली (जिमाका), दि. 05 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडून प्राप्त सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘अस्मिता महिला लीग’ आयोजनाबाबत मानक कार्यपद्धती निर्गमित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात भारतीय क्रीडा प्राधिकरण, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली, खेलो इंडिया, माय भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तालुका क्रीडा संकुल हिंगोली यांच्या सहकार्याने दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता तालुका क्रीडा मैदान, हिंगोली येथे ‘अस्मिता महिला लीग’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, क्रीडा सहभाग वाढविणे, स्थानिक स्तरावर क्रीडा चळवळ बळकट करणे तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. तसेच जिल्हा स्तरावर क्रीडा संरचना व तांत्रिक क्षमता विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत अॅथलेटिक्स प्रकारातील धावण्याच्या स्पर्धांचा समावेश असून १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. स्पर्धा १३ वर्षाखालील, १३ ते १८ वर्षे व १८ वर्षांवरील मुली व महिलांसाठी खुल्या राहतील.
नोंदणीच्या वेळी खेळाडूंच्या वयाची पडताळणी आधार कार्ड (प्राधान्याने), राज्य किंवा केंद्र शासनाने दिलेला जन्मतारीख नमूद असलेला पुरावा, दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र आदी कागदपत्रांच्या आधारे करण्यात येणार आहे. तसेच नोंदणीदरम्यान खेळाडूंचे वय, वजन व उंची नोंदविणे आवश्यक राहील.
हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक मुली व महिला खेळाडूंनी दि. ७ मार्च २०२६ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह https://account.kheloindia.gov.in/#/login या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी मेरा युवा भारत केंद्र, नाईक नगर, हिंगोली येथे प्रविण पांडे (मो. ७०२८३६९०७१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment