02 March, 2026

पोक्सो कायद्यान्वये सपोर्ट पर्सन नियुक्तीसाठी अर्ज करावेत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम, 2012 (पोक्सो कायदा) व पोक्सो  नियम 2020 अन्वये बाल पीडितांना न्यायप्रक्रिये दरम्यान सहाय्य व संरक्षण देण्यासाठी सपोर्ट पर्सन  म्हणून नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

यासाठी समाजकार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा बालविकास विषयातील पदव्युत्तर/पदवीधर, एमएस-सीआयटी  उत्तीर्ण किंवा पदवीधर व किमान 3 वर्षांचा बाल शिक्षण, बाल विकास किंवा बाल संरक्षण क्षेत्रातील अनुभव असलेले उमेदवार पात्र राहतील. तसेच  पोक्सो नियम 2020 मधील नियम 5 (6) नुसार बाल हक्क किंवा बाल संरक्षण क्षेत्रात कार्यरत संस्था तसेच बालगृह/निवारा गृहातील जबाबदार अधिकारी देखील अर्ज करू शकतात.

सपोर्ट पर्सन यांना बालक व त्यांच्या कुटुंबास न्यायप्रक्रियेदरम्यान मानसिक, भावनिक व सामाजिक सहाय्य करणे, बालकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे, आवश्यकतेनुसार पुनर्वसन व स्थलांतराची कार्यवाही करणे, शिक्षण, आरोग्य, समुपदेशन, कायदेशीर मदत व भरपाई मिळवून देण्यासाठी सहाय्य करणे, पोलीस, सीडब्ल्यूसी, डीसीपीयू, न्यायालय व इतर यंत्रणांशी समन्वय साधणे, नियमित गृहभेटी व मासिक अहवाल सादर करणे, पोक्सो ट्रॅकिंग पोर्टलवर माहिती अद्ययावत करणे तसेच गोपनीयता राखून निष्पक्षपणे कार्य करणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.

इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आपले अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, एस. 7, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे सादर करावेत.

अर्जांची छाननी झाल्यानंतर पोक्सो सपोर्ट पर्सन नियुक्ती समितीमार्फत पात्र उमेदवारांना मुलाखतीची  तारीख कळविण्यात येईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

******

No comments: