·
वाचक सभासद नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त
प्रतिसाद
हिंगोली (जिमाका), दि. 11 : हिंगोली
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने आयोजित करण्यात
आलेल्या विशेष वाचक सभासद नोंदणी अभियानाला विद्यार्थी, निवासी डॉक्टर, प्राध्यापक
व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैद्यकीय क्षेत्रातील धावपळ व ताणतणाव
दूर करण्यासाठी वाचनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत
अनेक भावी डॉक्टरांनी ग्रंथालयाचे सभासद होण्याबाबत मोठी उत्सुकता दर्शविली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता
चक्रधर मुंगल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या
वतीने या विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठवाडा विभाग ग्रंथालय
संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप-अधिष्ठाता राजहर्ष
हनुमंते यांची विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी
आशिष ढोक यांनी मार्गदर्शन करताना वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवेच्या ताणतणावातून मानसिक
ताजेपणा मिळविण्यासाठी वाचन अत्यंत उपयुक्त ठरते याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शासकीय जिल्हा ग्रंथालय हे केवळ वाचनालय नसून ते एक प्रकारचे ‘डिजिटल डिटॉक्स
सेंटर’ असल्याचे सांगत उत्तम पुस्तके मनासाठी ‘नैसर्गिक अँटी-डिप्रेसंट’प्रमाणे
कार्य करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
मानसशास्त्रातील ‘बिब्लिओथेरपी’ (ग्रंथोपचार)
या संकल्पनेचा संदर्भ देत दैनंदिन धकाधकीच्या जीवनात मनाला ताजेतवाने ठेवण्यासाठी
‘व्हिटॅमिन-आर’ अर्थात वाचनाचा नियमित डोस आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. वैद्यकीय
परिभाषेत मांडलेल्या या संकल्पनेला उपस्थित वैद्यकीय विद्यार्थी व प्राध्यापकांनी सकारात्मक
प्रतिसाद दिला.
येथील नेहरू नगर, रिसाला नाका येथे असलेल्या
शासकीय जिल्हा ग्रंथालयात अवांतर वाचनासाठी हजारो पुस्तके, कथा-कादंबऱ्या, थोर व्यक्तींची
चरित्रे तसेच पीजी नीट, यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथांचा
मोठा साठा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाचे अधिष्ठाता चक्रधर मुंगल, उप-अधिष्ठाता राजहर्ष हनुमंते, प्रशासकीय अधिकारी
प्रशांत चांदजकर, प्राध्यापक वर्ग, वैद्यकीय अधिकारी तसेच शासकीय जिल्हा ग्रंथालयाचे
कर्मचारी शंभुनाथ दुभळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. ताणतणाव मुक्तीसाठी राबविण्यात
आलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, या आवाहनाला प्रतिसाद देत लवकरच
मोठ्या संख्येने विद्यार्थी ग्रंथालयाचे सभासद होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
*****
.jpeg)
No comments:
Post a Comment