हिंगोली, दि. 7 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आज जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सुरु झाले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी विकास माने, प्रतीक्षा भुते यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार जीवककुमार कांबळे, हरिष गाडे, सखाराम मांडवगडे, विनोद डोणगावकर यांच्या उपस्थितीत संबंधित तालुक्यात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, डिजिटल सातबारा वैधता, महसूल सेवा सुलभ करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या समाधान शिबिरात औंढा नागनाथ तालुक्यातील 45 पोलीस पाटलांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच 75 फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली व सातबारा दुरुस्तीचे 4 अर्ज स्वीकारण्यात आले. याशिवाय नवीन शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेत नावे समाविष्ट करणे, विविध शासकीय योजनांची माहिती देणे तसेच 199 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अर्जांचे पत्र लाभार्थ्यांना देण्यात आले. ग्रामपंचायत अंतर्गत जन्म-मृत्यू दाखल्यांचे वाटप करण्यात आले तसेच सातबारा व गाव नमुना 8-अ ची प्रत लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली.
शिबिरात विविध विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते. महसूल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सुधारणांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
या कार्यक्रमास मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कर्मचारी, शेतकरी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. जी. पाटील यांनी केले तर आभार तलाठी एस. एल. सोनटक्के यांनी मानले.
*गिरगाव येथे समाधान शिबिराचे आयोजन*
या अभियानांतर्गत वसमत तालुक्यातील गिरगाव येथे आज समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नायब तहसीलदार पांडुरंग हांडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, डिजिटल सातबारा वैधता तसेच महसूल विभागाच्या विविध सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या समाधान शिबिरात वसमत तालुक्यातील ४५ पोलीस पाटलांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच १८८ फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली व सातबारा दुरुस्तीचे ५ अर्ज स्वीकारण्यात आले. याशिवाय नवीन शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेत नावे समाविष्ट करणे, विविध शासकीय योजनांची माहिती देणे तसेच ३१८ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अर्जांचे पत्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत जन्म-मृत्यू दाखल्यांचे वाटप करण्यात आले तसेच सातबारा व गाव नमुना ८-अ चे वितरण करण्यात आले.
या शिबिरात विविध विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते. महसूल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सुधारणा व सेवा नागरिकांना समजावून सांगण्यात आल्या. यावेळी मंडळ अधिकारी वंदना मजगे, मोनाली ढगे, सागर भालेराव, नामदेव हाके तसेच तलाठी, ग्रामसेवक, कर्मचारी, शेतकरी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळ अधिकारी प्रियंका खडसे यांनी केली. सूत्रसंचालन रामेश्वर गिरी यांनी केले तर आभार प्रियंका खडसे यांनी मानले.
यावेळी हिंगोली, सेनगाव व कळमनुरी तालुक्यातही या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
******






No comments:
Post a Comment