02 March, 2026

समाज कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 मार्चपर्यंत अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत सन 2024-2025 व 2025-2026 या कालावधीसाठी विविध पुरस्कार योजनांसाठी राज्यातील पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार तसेच शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक पुरस्कार या योजनांचा समावेश आहे.

या पुरस्कारांद्वारे अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग, तसेच विविध सामाजिक घटकांच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव तीन प्रतीत दिनांक 15 मार्च 2026 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली केले आहे.

वरील सर्व पुरस्कारांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्ती/संस्थांनी समाजकल्याण क्षेत्रात दीर्घकालीन व मौलिक कार्य केलेले असणे आवश्यक आहे. व्यक्तींसाठी  साधारणतः किमान 10 ते 15 वर्षांचा अनुभव आवश्यक असून पुरुषांसाठी किमान वय 50 वर्षे व महिलांसाठी 40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. स्वयंसेवी संस्था या संबंधित कायद्यांतर्गत नोंदणीकृत असाव्यात व किमान 5 ते 10 वर्षे कार्यरत असणे अपेक्षित आहे. संस्थांकडे मागील पाच वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल, गैरव्यवहार नसल्याचे प्रमाणपत्र तसेच सार्वजनिक संपत्तीचा अपहार न केल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.

तसेच अर्जदारांविरुद्ध कोणतीही फौजदारी किंवा दंडात्मक कार्यवाही नसावी व संस्था राजकारणापासून स्वतंत्र असावी, अशी अटही घालण्यात आली आहे. पुरस्कारासाठी पात्रता ही व्यक्ती किंवा संस्थेच्या मौलिक सामाजिक कार्याच्या आधारे निश्चित करण्यात येणार असून कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कार देण्यात येणार नाही.

अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

*******

No comments: