25 March, 2026

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून रोजी * ऑनलाईन अर्ज भरण्यास 27 मार्चपासून सुरुवात

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महाटीईटी)-2026 परीक्षा रविवार, दि. 21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर-1) व इयत्ता 6 वी ते 8 वी (पेपर-2) साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे तसेच सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षण सेवक/शिक्षक पदासाठी नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

या परीक्षेशी संबंधित शासन निर्णय, सूचना व सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून परीक्षार्थ्यांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची  प्रक्रिया दि. 27 मार्च 2026 पासून सुरू होत असून दि. 16 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधीही दि. 27 मार्च ते दि. 16 एप्रिल 2026 असा आहे. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढण्याचा कालावधी दि. 9 जून ते दि. 21 जून 2026 असा राहील.

परीक्षा वेळापत्रकानुसार पेपर-1 (इयत्ता 1 ली ते 5 वी) रविवार, दि. 21 जून 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत होणार असून पेपर-2 (इयत्ता 6 वी ते 8 वी) त्याच दिवशी दुपारी 2.30 ते सायंकाळी  5 या वेळेत होणार आहे.

काही प्रशासकीय कारणास्तव वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्यावत माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

******

No comments: