24 March, 2026

गाव बाल संरक्षण समिती सदस्यांना कार्यशाळेत दिली माहिती

 



हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्हा महिला व बाल विकास विभाग, हिंगोली व मिरॅकल फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच समुदाय स्तरावरील भागधारक (गाव बाल संरक्षण समिती) यांच्यासाठी बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम तसेच गाव बाल संरक्षण समितीची भूमिका व जबाबदाऱ्या या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत गाव बाल संरक्षण समिती सदस्यांनी माहिती दिली.

या प्रशिक्षणास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. आर. दरपलवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, कायदा तथा परिविक्षा अधिकारी अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्त्या रेशमा पठाण, रामप्रसाद मुडे, चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, समुपदेशक अंकुर पातोडे, केस वर्कर सूरज इंगळे, तथागत इंगळे तसेच अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, ग्रामसेवक, शाळांचे मुख्याध्यापक व संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रशिक्षणामध्ये बाल न्याय अधिनियम (मुलांची काळजी व संरक्षण), कुटुंब सक्षमीकरण तसेच गाव बाल संरक्षण समितीची भूमिका व जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गटकार्याच्या माध्यमातून बालविवाह, बालमजुरी, व्यसनाधीनता, शाळाबाह्य मुले, कुटुंब सक्षमीकरण व बाल शोषण या विषयांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचा सराव घेण्यात आला.

प्रशिक्षणानंतर सहभागी सदस्यांनी गाव पातळीवरील बाल संरक्षण समित्या अधिक सक्रिय करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी बाल संरक्षण क्षेत्रात समन्वय व सहकार्य वाढविण्याची गरज अधोरेखित केली. या कार्यशाळेत एकूण ४८ सहभागी उपस्थित होते. बाल संरक्षण विषयक विविध मुद्द्यांवर चर्चा करून प्रत्येक बालकाला सुरक्षित, प्रेमळ व आनंदी कुटुंब मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कुटुंब आधारित व पर्यायी संगोपन कार्यक्रमांतर्गत गाव बाल संरक्षण समिती सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण हिंगोली येथे पार पडले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

*******

No comments: