10 March, 2026

जिल्ह्यात 22 मार्चपर्यंत लोक जल उत्सव

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी तसेच सामुदायिक सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने दि. 8 ते 22 मार्च 2026 या कालावधीत जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर लोक जल उत्सव (जल महोत्सव) राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिली आहे.

ग्रामीण भागात जलसंवर्धनाची परंपरा विकसित करण्यावर भर देण्यासाठी देशभरात ‘जल महोत्सव साजरा केला जात आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घराला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जलजीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वस्तीगृहांना नळ जोडणी देण्यात येत आहे. तसेच आदिवासी पाड्यांसाठी सौरऊर्जा आधारित नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत.

जल महोत्सव जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर आयोजित करण्यात येणार असून ग्रामपंचायत स्तरावर लोक जल उत्सव साजरा केला जाणार आहे. हा उपक्रम पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असून गावात ग्रामसभा, पाणी समितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जाणार आहे.

या उत्सवाच्या निमित्ताने गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व इतर महिलांमार्फत फिल्ड टेस्टिंग किटच्या साहाय्याने जल गुणवत्ता चाचणी केली जाणार आहे. तसेच लोकप्रतिनिधी व नागरिक जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेणार असून जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतरण ‘जल अर्पण दिवस म्हणून करण्यात येईल व सामुदायिक शपथ दिली जाईल. तसेच ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाणी व्यवस्थापनाचा समावेश करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) समृद्धी दिवाणे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. नरवाडे यांनी केले आहे. 

 

*****

No comments: