रोजगार निर्मितीत हिंगोली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची आढावा बैठक संपन्न झाली. यामध्ये जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समिती, स्थानिक रोजगार निर्मिती, आजारी उद्योग पुनर्वसन, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत डीएलटीपीसी सभा तसेच निर्यात प्रचालन सभा आदींचा समावेश होता.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी तसेच उद्योजक संघटनेचे श्री. मामडे, नंदकिशोर तोष्णीवाल, प्रवीण सोनी, अतुल बेरळीकर, नितीन काबरा, केशव काबरा आदी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सहकारी औद्योगिक वसाहती तसेच एमआयडीसीमधील पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट या मूलभूत सुविधांबाबतही चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 1000 प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी 838 कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून या कामगिरीमुळे हिंगोली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. तसेच जिल्हा उद्योग केंद्राला देण्यात आलेले 600 प्रकल्पांचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रारंभी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम यांनी विविध योजनांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. शेवटी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रवींद्र पत्की यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*******



No comments:
Post a Comment