14 March, 2026

जल महोत्सव अभियानांतर्गत आडगाव मुटकुळे येथे ‘जल अर्पण दिन’ उत्साहात


• जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती

 



हिंगोली, दि. १४ (जिमाका) : जल महोत्सव अभियानांतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे अध्यक्ष राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथे ‘जल अर्पण दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी उप विभागीय अधिकारी योगेशकुमार मीना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) समृद्धी दिवाने, कार्यकारी अभियंता श्री. नरवाडे, गटविकास अधिकारी माया वानखेडे, उपअभियंता श्री. शिंदे, शाखा अभियंता जाधव, नितीन रायबोले, सरपंच ज्ञानोबा मुटकुळे, ग्रामपंचायत अधिकारी आर. बी. हेलगंड उपस्थित होते.

 ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद हिंगोली व पंचायत समिती हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचे ग्रामस्थांना हस्तांतरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जलदिंडीने झाली. भजनी मंडळ, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी कलश घेऊन प्रभातफेरीद्वारे गावातील प्रमुख मार्गांवरून पाण्याच्या टाकीपर्यंत जलदिंडी काढली. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीस्थळी जलदेवतेच्या कलशाचे पूजन करून जल अर्पण करण्यात आले.

यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शनद्वारे शाश्वत, स्वच्छ व दर्जेदार पाणी उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचा उद्देश साध्य झाला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. तसेच ‘जल तारा’ योजनेअंतर्गत पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जतन करण्यासाठी पाणी पुनर्भरणाच्या उपक्रमांवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.


मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी जलजीवन मिशनचा उद्देश गावातील प्रत्येक कुटुंबास नळाद्वारे दरडोई ५५ लिटर स्वच्छ व दर्जेदार पाणी पुरवठा करणे हा असून तो साध्य झाल्याचे सांगितले. तसेच आता या योजनेची देखभाल, दुरुस्ती व पाणी गुणवत्तेची जबाबदारी ग्रामस्थांची असून ही योजना ग्रामस्थांच्या मालकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या शाळा व स्मशानभूमीच्या प्रश्नांबाबतही सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक (जलजीवन मिशन) समृद्धी दिवाने यांनी केले. कार्यकारी अभियंता श्री. नरवाडे यांनी नळ पाणीपुरवठा योजनेबाबत तांत्रिक माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुनीर पठाण व महेश थोरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र सरकटे यांनी मानले. यावेळी आशा वर्कर, बचत गटाच्या महिला, आरोग्य कर्मचारी, विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, मुख्याध्यापक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

*****

No comments: