हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र, हिंगोली कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने खेळाडू निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार असून शूटिंग (नेमबाजी) व मैदानी क्रीडा प्रकारांसाठी ही निवड चाचणी दि. 10 एप्रिल 2026 रोजी घेण्यात येणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत ‘मिशन लक्ष्यवेध योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत रायफल व पिस्टल शूटिंग (नेमबाजी) तसेच मैदानी क्रीडा प्रकारांसाठी तालुका क्रीडा संकुल, हिंगोली येथे जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.
या केंद्रात निवड झालेल्या खेळाडूंना निवासी/अनिवासी स्वरूपात दर्जेदार क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, अल्पोपहार सुविधा तसेच क्रीडा विज्ञान विषयक सहाय्य शासन मान्यतेनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पात्र व गुणवंत खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक खेळाडूंनी आपले आवेदनपत्र आवश्यक कागदपत्रांसह दि. 6 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. निलकंठ श्रावण यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
******
No comments:
Post a Comment