30 March, 2026

बालमृत्यू रोखण्याला आरोग्य विभागाचे सर्वोच्च प्राधान्य- मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे प्रतिपादन

 



​हिंगोली (दि. ३०): "जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचा जीव वाचविणे हे आरोग्य विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने आणि सूक्ष्म नियोजनाने काम करणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.

​हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित 'बालमृत्यू अन्वेषण'संदर्भात विशेष बैठकीत ते बोलत होते.

​सामाजिक व संस्था स्तरावरील मृत्यूंचे सखोल अन्वेषण

​जिल्ह्यात नोंदवण्यात आलेल्या एकूण ८८ बालमृत्यूंपैकी, सामाजिक स्तर आणि संस्था स्तरावरील ६ बालमृत्यूंच्या प्रकरणांचे सविस्तर अन्वेषण या बैठकीत करण्यात आले. त्यापैकी सामाजिक स्तरावरील ३ विशेष प्रकरणांवर बालमृत्यू समितीच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत सखोल चर्चा करण्यात आली.

​यावेळी विवेक गायकवाड यांनी प्रत्येक प्रकरणाचा तांत्रिक आणि सामाजिक आढावा घेतला. बालक दगावण्यामागील नेमकी कारणे, उपचारांतील उणीव, किंवा कुटुंबियांना वेळेत मार्गदर्शन मिळाल्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

​प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर

​भविष्यात असे दुर्दैवी मृत्यू टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात यावा 

​वेळेत उपचार: जोखमीच्या मातांची वेळेत ओळख पटवून त्यांना तातडीने योग्य संदर्भ सेवा देण्यात यावी.

​प्रत्येक मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करून त्या-त्या भागात विशेष प्रतिबंधात्मक  उपाययोजना राबवाव्यात. आरोग्य विभागाने 'जीव वाचविण्याचे' आपले मूळ उद्दिष्ट समोर ठेवून काम करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा बालरोग तज्ज्ञ डॉ. दि

दीपक मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस शैलेजा कुप्पास्वामी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. संदीप काळे, मनिषा वडकुते कार्यक्रम सहाय्यक मुनाफ शेख ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहायिका व आरोग्य सेविका उपस्थित होते.

**

No comments: