24 March, 2026

मतदार मॅपिंग कामकाजाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा


हिंगोली (जिमाका), दि. २४ : आगामी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण-2026 कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील मतदार यादीतील मतदारांचे सन २००२ मधील मतदारांशी मॅपिंग तसेच मॅपिंगच्या प्रगतीबाबत आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. 


भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर होणार असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदार मॅपिंगचे काम दि. २० जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ९२-वसमत विधानसभा मतदारसंघात ८०.२८ टक्के, ९३-कळमनुरीमध्ये ७८.८७ टक्के तर ९४-हिंगोलीमध्ये ७४.३७ टक्के मॅपिंग पूर्ण झाले असून जिल्ह्याचा एकूण प्रगतीदर ७७.८० टक्के आहे.

मतदार मॅपिंगचे काम गतिमान करण्यासाठी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी टेबल-टाॅप अँक्टिव्हिटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी व पडताळणी करणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, ५५ टक्क्यांपेक्षा कमी प्रगती असलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी एसआयआर-2026 च्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करून मतदार मॅपिंगचे काम दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आणि तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना देण्यात आल्या.

सन २००२ व सन २०२४ च्या मतदार यादीतील नोंदींचे मॅपिंग सुलभ व्हावे यासाठी नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती, विशेषतः विवाहित महिलांनी माहेरच्या कुटुंबाची माहिती, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मतदारांना केले आहे.

*** 



No comments: