06 March, 2026

जिल्ह्यात 13 हजार 288 मुलींना मोफत देणार कर्करोगावरील सुरक्षा लस



प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात मिळणार एचपीव्ही लस

खासगी रुग्णालयात मोजावे लागतील 10 हजार रुपये

जिल्ह्यातील मुलींनी मोफत लस घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन 


हिंगोली, जिमाका (दि.6): दैनंदिन जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढत असताना, सार्वजनिक आरोग्य विभागाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य शासनाच्या निर्देशनुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 14 वर्षे पूर्ण झालेल्या पण 15 वा वाढदिवस साजरा न केलेल्या (जन्म तारीख 8 मार्च 2011 ते 7 मार्च 2012 या कालावधीत जन्मलेल्या) जिल्ह्यातील सुमारे 13 हजार 288 किशोरवयीन मुलींना गर्भाशयाच्या मुख कर्करोगावरील (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) प्रतिबंधात्मक लस मोफत दिली जाणार आहे.  

  गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात जिल्हा प्रशासनमार्फत एचपीव्ही सुरक्षित लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही लस पूर्णत: सुरक्षित असून, या लसीमुळे भविष्यात मुलींना गर्भाशय मुख कर्करोग होणार नाही. या मोहिमेचा जिल्ह्यातील सुमारे 13 हजार 288 मुलींना थेट फायदा होणार आहे. सर्व पालकांनी या मोहिमेमध्ये आपल्या मुलींना ही लस द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने पालकांना केले आहे.

गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील दुसऱ्या क्रमांकाचा जीवघेणा आजार ठरत आहे. खासगी रुग्णालयांत या एका लसीसाठी जवळपास 10 हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे ही लस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. हीच लस आता जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेमध्येच आयुष्यमान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विनामूल्य मिळणार आहे. ही लस घेतल्यास कर्करोगाचा धोका 99 टक्क्यांनी कमी होतो. 

गर्भाशय कर्करोग: वेळीच सावधनता बाळगावी


अस्वच्छता, असुरक्षित संबंध आणि हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग वाढतोय. सध्या हा आजार महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा वयाच्या 14 ते 15 व्या वर्षी 'एचपीव्ही' लस घेणे हाच सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील मुलींनाही या महागड्या लसीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे भविष्यातील पिढी आरोग्यदायी राहील. त्यामुळे किशोरवयीन मुलींच्या पालकांनी ही लसीकरण करून घ्यावे. ही लस एकदम सुरक्षित असून, जगात जवळपास 80 देशात ही लस किशोरवयीन मुलींना यशस्वी दिलेली आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे. 

मोहीम यशस्वी राबवण्यासाठी सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखखाली प्रशिक्षित स्टाफमार्फत फक्त आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयामध्येच दिली जाणार आहे.


 हे एचपीव्ही लसीकरण पूर्णपणे ऐच्छिक आहे. लसीकरणासाठी पालकाची संमती अनिवार्य असून, ती यु-विन पोर्टलवर डिजिटल स्वरुपात किंवा इंटरनेट नसल्यास लेखी स्वरुपात घेतली जाईल. लसीकरणानंतर डाव्या हाताच्या तर्जनीवर शाईने चिन्ह केले जाईल. 

मुलींनी उपाशीपोटी लस घेऊ नये; पालकांनी त्यांना नाश्ता देऊन लसीकरणासाठी पाठवावे, लसीकरणानंतर किमान 30 मिनिटे निरीक्षणाखाली थांबणे आवश्यक आहे. ही लस अत्यंत सुरक्षित आहे.

- डॉ. सतिश रुणवाल, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी 

 *****

No comments: