हिंगोली (जिमाका), दि. 4 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने सन 2024-25 या वर्षासाठी जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी पात्र युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांकडून नामांकने मागविण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी हा पुरस्कार एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्थेला प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारामध्ये युवक व युवतीस प्रत्येकी गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रु. 10 हजार रोख रक्कम, तर संस्थेस गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रु. 50 हजार रोख रक्कम देण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक/युवतीचे वय संबंधित वर्षाच्या 1 एप्रिल रोजी 13 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे तसेच अर्जदाराचे संबंधित जिल्ह्यात किमान 5 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. अर्जासोबत केलेल्या कार्याचे पुरावे (वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, फोटो, चित्रफिती इ.) जोडणे बंधनकारक आहे. तसेच चारित्र्य प्रमाणपत्र व हमीपत्र सादर करणे आवश्यक राहील. शासकीय व निमशासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच प्राध्यापक या पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
संस्थांसाठीही स्वतंत्र पात्रता निकष निश्चित करण्यात आले असून संबंधित संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 अंतर्गत नोंदणीकृत असावी व किमान 5 वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे.
या पुरस्कारासंदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 201311121122043321 आहे. इच्छुकांनी अर्जाचा विहित नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथून कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घ्यावा व पूर्ण प्रस्तावासह दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत सादर करावा.
अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment