28 March, 2026

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध * अफवांवर विश्वास ठेवू नका — जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा आवश्यक व पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन पुरवठा साखळी सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्या जिल्ह्यात पेट्रोल ३२० किलोलिटर व डिझेल ४३८ किलोलिटर इतका साठा उपलब्ध आहे.


प्रशासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पुरवठा निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांनी विविध पेट्रोल पंपांना प्रत्यक्ष भेट देऊन साठ्याची तपासणी केली आहे. काही ठिकाणी अफवांमुळे अचानक मागणी वाढल्याने तात्पुरती टंचाई निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, नवीन साठा उपलब्ध होताच ही टंचाई तात्काळ दूर करून इंधन पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला आहे.


*पेट्रोल पंप धारकांना सूचना :*

सर्व पेट्रोल पंप चालकांनी कोणत्याही परिस्थितीत कृत्रिम टंचाई निर्माण करू नये व इंधनाची विक्री विहित दरानेच करावी. साठ्याची माहिती दररोज दर्शनी भागावर लावावी तसेच नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.


*नागरिकांना आवाहन :*

इंधन टंचाईबाबत पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात कोणतीही टंचाई नसल्याने पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तेल कंपन्यांकडून इंधन पुरवठा नियमित सुरू असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.


तसेच, हिंगोली जिल्ह्यासाठी ६० किलोलिटर केरोसीन नियतन मंजूर झाले असून, साठा प्राप्त होताच त्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी केले आहे.

*******

No comments: