* जिल्ह्यात पुरेसा गँस
सिलिंडर साठा
* प्रशासनाकडून चौकशी/तक्रारीसाठी
संपर्क क्रमांक जारी
हिंगोली (जिमाका), दि. 13 : सद्यस्थितीत
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात
घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत असल्याचे निदर्शनास
आले आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करतानाच जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी
घरगुती गॅस सिलेंडर संदर्भातील चौकशी किंवा तक्रारींसाठी ९४०३५५९४९४, ८५४५०८८५४५, ०२४५६-२२१७०१,
९४०४६५८५४६ हे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास
सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा
साठा सध्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गॅसचा पुरवठा नियमित व सुरळीत सुरू आहे. त्यामुळे
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा
पुरवठा सध्या प्राधान्याने वैद्यकीय क्षेत्र तसेच शैक्षणिक संस्थांच्या खानावळींसाठी
करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, व्यावसायिक खानावळी, कॅफे, खाद्यपदार्थ
विक्री करणारे हातगाडे आदी ठिकाणी तपासणीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान
कुठेही घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर
कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सी
तसेच गॅस कंपनीचे विक्री अधिकारी व प्रतिनिधींना प्रशासनाकडून गॅस सिलेंडरचा पुरवठा
सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही
प्रकारचा घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसून सर्व एजन्सीमार्फत नियमितपणे गॅस सिलेंडरचा
पुरवठा सुरू आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊन गॅस सिलेंडरची
अनावश्यक अतिरिक्त बुकिंग किंवा साठा करू नये. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत
माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर
कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
*****
No comments:
Post a Comment