येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात हिंगोली ग्रंथोत्सव-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात प्रा. जी. पी. मुपकलवार यांच्या अध्यक्षतेखाली कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वाचन संकृती तसेच सृजनशील लेखन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता वाचन संस्कृतीला पूरक, पर्याय नाही – डॉ. तुकाराम हापगुंडे
कृत्रिम बुद्धिमत्ता हे आधुनिक तंत्रज्ञान माहिती मिळविण्यास उपयुक्त असले तरी ते वाचन संस्कृतीचा पर्याय ठरू शकत नाही. ज्ञान प्राप्तीसाठी ग्रंथ वाचन अत्यावश्यक असून, व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन हीच मुख्य प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. तुकाराम हापगुंडे यांनी हिंगोली येथे आयोजित ग्रंथोत्सवात “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वाचन संस्कृती” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी त्यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही माहितीचा स्रोत आहे; मात्र ज्ञानाचा स्रोत नाही. माणसाच्या मेंदू आणि पुस्तक यांच्यातील थेट संवादातूनच खरे ज्ञान निर्माण होते. त्यामुळे वाचनाशिवाय व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. मशीन लर्निंगसारख्या तंत्रज्ञानामुळे माहिती सहज उपलब्ध होत असली तरी त्यातून एकाग्रतेत घट व विचलन वाढण्याचा धोका आहे. ऑडिओ बुक्स किंवा तांत्रिक साधने ही केवळ सहाय्यक भूमिका बजावू शकतात, परंतु सखोल आकलनासाठी प्रत्यक्ष वाचन आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य प्रमाणात वापर करून माहिती संकलन, संदर्भ शोध यासाठी मदत घेता येते; मात्र उर्वरित ज्ञानासाठी ग्रंथ वाचन अपरिहार्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या बदलत्या काळात तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना वाचन संस्कृती जपणे गरजेचे असून, विद्यार्थ्यांनी आणि समाजाने यासाठी सजग प्रयत्न करावेत, असे आवाहनही डॉ. हापगुंडे यांनी यावेळी केले.
सृजनशील लेखनासाठी कल्पनाशक्ती, अनुभव आणि भावना अत्यावश्यक- डॉ. दत्ता सावंत
सृजनशील लेखनासाठी लेखकाकडे समृद्ध कल्पनाशक्ती, जीवनानुभव आणि भावनांची अभिव्यक्ती असणे अत्यावश्यक आहे. कृत्रिम साधनांपेक्षा मानवी संवेदना आणि अंतर्मनातून उमटणारे विचारच खऱ्या साहित्यनिर्मितीचा पाया घालतात, असे प्रतिपादन प्रा. डॉ. दत्ता सावंत यांनी हिंगोली येथे आयोजित ग्रंथोत्सवात “सृजनशील लेखन” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी त्यांनी लेखक आजूबाजूच्या घटना, परिस्थिती आणि व्यक्तींचे सूक्ष्म निरीक्षण करून कल्पनाशक्तीच्या आधारे साहित्यनिर्मिती करतो. लेखनात भावना हा केंद्रबिंदू असून वाचकांपर्यंत त्या पोहोचल्या तरच साहित्य प्रभावी ठरते. कोणत्याही साहित्यकृतीमागे ठराविक उद्देश असतो. लेखकाने “मी का लिहितो?” हा मूलभूत प्रश्न स्वतःला विचारणे आवश्यक आहे. तसेच लेखन ही केवळ अभिव्यक्ती नसून मानसिक संतुलन राखण्याचे एक प्रभावी माध्यमही ठरू शकते. साहित्यनिर्मितीसाठी निरीक्षण कौशल्य, अनुभवांचे संकलन आणि भाषेची साधी, सोपी व प्रभावी मांडणी महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. वाचकांना सहज समजेल अशा भाषेत लेखन केल्यास साहित्य अधिक प्रभावीपणे पोहोचते, असेही त्यांनी सांगितले. पात्रनिर्मिती करताना मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण आवश्यक असून, समाजातील वास्तव घटनांवर आधारित साहित्यच वाचकांच्या मनाला भिडते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच साहित्याच्या माध्यमातून समाजातील वास्तव, समस्या आणि मूल्ये प्रभावीपणे मांडता येतात, असेही त्यांनी सांगितले. आजच्या काळात वाढत्या तांत्रिक साधनांमुळे लेखन प्रक्रियेवर परिणाम होत असला तरी सृजनशील लेखनासाठी मानवी अनुभव, चिंतन आणि संवेदनशीलता यांना पर्याय नाही, असे त्यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केले.
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – प्रा. जी. पी. मुपकलवार
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करणे आवश्यक असून, सृजनशील लेखनासाठी कल्पनाशक्ती, सूक्ष्म निरीक्षण आणि योग्य भाषेची निवड महत्त्वाची आहे, असे मत प्रा. जी. पी. मुपकलवार यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले.
हिंगोली येथे आयोजित ग्रंथोत्सवात “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वाचन संस्कृती तसेच सृजनशील लेखन” या विषयावरील व्याख्यानाच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती देऊ शकते; मात्र मानवी संवेदना, अनुभव आणि सर्जनशीलता यांना पर्याय ठरू शकत नाही. लेखकासाठी कल्पनाशक्तीबरोबरच सूक्ष्म निरीक्षण अत्यावश्यक असून, योग्य शब्दांची व भाषेची निवड लेखन प्रभावी बनवते. वाचकांना सहज समजेल अशा साध्या व सरळ भाषेत लेखन केल्यास साहित्य अधिक परिणामकारक ठरते. मराठीसह इतर भाषांचे ज्ञानही आवश्यक असून, ज्या भाषेत व्यक्त होणे सोपे वाटते त्या भाषेचा वापर करावा. त्याचबरोबर मराठी भाषेचा प्रसार व जतन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. वाचन केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, तसेच शब्दसंग्रह वाढत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे साहित्य कथा, कादंबऱ्या, कविता यांचे नियमित वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले. वाचनातूनच विचारशक्ती, आकलन क्षमता आणि व्यक्तिमत्व विकास साध्य होतो, असेही त्यांनी नमूद केले. लेखन ही केवळ अभिव्यक्ती नसून मानसिक समाधान व आत्मविकासाचे साधन असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजातील वास्तव समजून घेण्यासाठी आणि योग्य विचार मांडण्यासाठी साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रा. मुपकलवार यांनी अधोरेखित केले.
या व्याख्यानाचे सूत्रसंचालन गोडाती काळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन रतन आडे यांनी केले. या व्याख्यान कार्यक्रमास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******

.jpeg)



No comments:
Post a Comment