02 October, 2026

जलसुरक्षिततेसाठी हिंगोलीत १० हजार जलसाठे उभारणार– जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

जलसुरक्षिततेसाठी हिंगोलीत १० हजार जलसाठे उभारणार– जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
▶️ जलपूजनाने ‘जल सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ; अधिकारी-कर्मचाऱ्यांची जलसंवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा

हिंगोली, दि. २ ऑक्टोबर (जिमाका) : जिल्ह्यातील भूजल पातळी वाढवून जलसुरक्षितता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक तसेच ग्रामीण भागात १० हजार लहान जलसाठे निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

जलसंवर्धन, जलसंधारण आणि जलसंपत्तीच्या शाश्वत व सुयोग्य वापराबाबत जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘जल सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ आज  ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळाच्या हिंगोली कार्यालय येथे जलपूजनाने करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जलप्रतिज्ञा घेतली. जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी यावेळी सामूहिक संकल्प करण्यात आला.

 *जलसंवर्धनासाठी लोकसहभागावर भर* 
जलसंवर्धन ही केवळ सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी पाण्याचा सुयोग्य वापर करावा. जलस्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सातत्याने योगदान द्यावे, असे आवाहन राहुल गुप्ता यांनी केले.

अधीक्षक अभियंता सुधाकर कचकलवार यांनी जलसंपदा विभागामार्फत पूर्ण झालेल्या तसेच प्रगतिपथावर असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. उपलब्ध जलसंपत्तीचा कार्यक्षम वापर आणि जलस्रोतांचे संरक्षण यासाठी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.

 *ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळाचे कार्यालय हिंगोलीत* 
अधीक्षक अभियंता, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड  यांचे कार्यालय हिंगोली जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शासनाचे आभार मानले.
कार्यक्रमास मंडळ कार्यालयांतर्गत कार्यरत सर्व कार्यकारी अभियंता, उपअभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी जलस्रोतांचे संरक्षण, पाण्याचा सुयोग्य वापर आणि जलसंपत्तीच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.

 *महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन* 
महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जल पूजन करून ‘जल सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ करण्यात आला.

No comments: